महिलेचे कपडे अचानक होतात गायब; तक्रारीने पोलीस गेले चक्रावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 21:07 IST2021-12-06T21:06:06+5:302021-12-06T21:07:36+5:30
Invisible Power : आपले कपडे, पैसे आणि अन्न चोरून तसेच दागिन्यांचे वजन घटले असून या अदृश्य शक्तीपासून मुक्तता मिळवण्याची विनंती केली आहे. याबाबत पोलीस संभ्रमात पडले आहेत.

महिलेचे कपडे अचानक होतात गायब; तक्रारीने पोलीस गेले चक्रावून
बैतुल - मध्य प्रदेशातील एका सरकारी महिला अभियंत्याने बैतूल जिल्ह्यातील कोतवाली पोलिस ठाण्यात अर्ज करून आपले कपडे, पैसे आणि अन्न चोरून तसेच दागिन्यांचे वजन घटले असून या अदृश्य शक्तीपासून मुक्तता मिळवण्याची विनंती केली आहे. याबाबत पोलीस संभ्रमात पडले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बैतुल येथील पंतप्रधान ग्रामीण रस्ते प्रकल्पात काम करणाऱ्या श्रुती झाडे या महिला अभियंत्याने ही तक्रार केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी रत्नाकर हिंगवे म्हणाले, 'या महिला अभियंत्याने शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर लेखी अर्ज दिला आहे. अर्जात असा दावा करण्यात आला आहे की, काही अदृश्य शक्ती ज्याचे पाय दिसतात आणि कधी पांढर्या किंवा काळ्या कपड्यांमध्ये तिच्या घरी येते आणि तिने तयार केलेले अन्न खाते. एवढेच नाही तर या अदृश्य शक्तीने तिच्या सोन्याच्या दागिन्यांचे वजनही कमी केले आहे. यासोबतच ती घरात ठेवलेले कपडे आणि पैशांवरही हात साफ करते.
पोलिसांना आवाहन केले
शहरातील टिकारी भागात राहणाऱ्या या महिलेच्या म्हणण्यानुसार, गेल्या ४-५ दिवसांपासून ती घाबरलेली आहे. काही उपाय करून या संकटातून सुटका करावी, अशी मागणी या महिलेने पोलिसांकडे केल्याचे हिंगवे यांनी सांगितले.
या महिलेच्या तक्रारीवर हिंगवे म्हणाले की, कधी कधी भ्रमामुळे मनात जे चालले असते ते प्रत्यक्षात घडताना दिसते, तर प्रत्यक्षात असे काहीही घडत नाही. त्यांचा काहीसा गोंधळ झाला असावा. त्यांना समजावून सांगून त्यांच्या मनातील भ्रम व संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.