डोंबिवलीत खळबळजनक, सोफा कम बेडमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:40 IST2022-02-16T16:29:06+5:302022-02-16T16:40:54+5:30
DeadBody Found : डोक्यावर प्रहार आणि गळा आवळून तीची हत्या करण्यात आली आहे. एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

डोंबिवलीत खळबळजनक, सोफा कम बेडमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
डोंबिवली: सुप्रिया किशोर शिंदे या 33 वर्षीय महिलेची हत्या करून तीचा मृतदेह घरातील सोफा कम बेडमध्ये दडवून ठेवल्याची धककादायक घटना पुर्वेकडील दावडी परिसरात मंगळवारी रात्री उघडकीस आली. सुप्रियाचा पती कामावर गेला होता तर मुलगा शाळेत गेला होता. दुपारी 12.30 ते संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान हत्येचा प्रकार घडला असून आरोपी सुप्रियाच्या परिचयाचा असावा असा अंदाज बांधला जात आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात पती किशोर याच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्हयाच्या तपासकामी पोलिसांची तीन ते चार पथके गठीत केली आहेत.
दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी बिल्डींगमध्ये बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मुलगा दुपारी साडे बारा वाजता शाळेत गेला होता. सुप्रियाची तब्येत बरी नसल्याने शेजारी राहणा-या महिलेला तीने मुलाला शाळेत सोडण्यास सांगितले. संध्याकाळी साडेपाचला मुलगा शाळेतून घरी आला तर दार ठोकूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या घराची एक चावी शेजा-यांकडेही असते. तिच्या सहाय्याने लॉक उघडले असता सुप्रिया घरात कुठेही आढळून आली नाही. आजूबाजूला शोध घेऊनही तीचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने ही माहीती पती किशोरला देण्यात आली. त्यानेही नातेवाईकांकडे चौकशी केली पण तीचा शोध लागला नाही. अखेर किशोरने पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान घरात दररोज येणा-यांना घरातील सोफा कम बेडवरील चादर आणि सोफा विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तो उघडला असता सुप्रिया हिचा मृतदेह सोफ्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळून आला. डोक्यावर प्रहार आणि गळा आवळून तीची हत्या करण्यात आली आहे. एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
रिक्षामध्ये २५ वर्षीय तरुणीवर गँगरेप; जोरजोरात गाणं वाजवल्याने पीडितेची मदतीची हाक पोहोचली नाही
मोबाईल गायब
सुप्रियाचा मोबाईल गायब झाला असून तीच्या हरविलेल्या मोबाईचा पोलिसांनी सीडीआर रिपोर्ट मागविला आहे. प्लास्टिकच्या दोन मोठया टॅगने तीचा गळा आवळण्यात आला आहे. डोक्यावर तीच्या गंभीर जखम आहे. प्रहार केल्यावर जमिनीवर उडालेले रक्त ज्या कापडयाने साफ केले ते कापड घराच्या माळयावर सापडले आहे.