डेहरादूनच्या प्रसिद्ध पलटन बाजारात एका दागिन्यांच्या दुकानातून सोन्याच्या अंगठ्या चोरताना एका महिलेला पकडल्यानंतर एकच गोंधळ पाहायला मिळाला. दुकान मालकाने तिला रंगेहाथ पकडलं आणि लगेचच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस दुकानात पोहोचल्यावर महिलेने अंगठ्या लपवून पोलिसांवरच हल्ला केला. बराच वेळ गोंधळ घातल्यानंतर अखेर महिलेने सरेंडर केलं. हायव्होल्टेज ड्राम्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गुरुवारी ही घटना घडली. एका महिलेने बाजारातील एका मोठ्या दागिन्यांच्या दुकानात प्रवेश केला आणि तिथून दोन सोन्याच्या अंगठ्या चोरल्या. दुकानदाराने तिला रंगेहाथ पकडलं. यानंतर दुकानदाराने ताबडतोब पोलिसांना फोन केला. कोतवाली पोलिसांनी काही वेळातच घटनास्थळी पोहोचून महिलेला पकडण्याचा प्रयत्न केला. पण महिला आधी मोठ्याने ओरडू लागली आणि गोंधळ घालू लागली. त्यानंतर पोलीस आणि महिलेमध्ये जोरदार झटापट झाली. व्हिडिओमध्ये महिला कॉन्स्टेबलचे केस धरून ओढत असल्याचं दिसून येतं.
सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @SoniyaK65017060 या युजरने शेअर केला आहे. जो ४० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. पोलिसांनी त्यांच्यावरच हल्ला केलेल्या महिलेला खूप प्रयत्नांनंतर ताब्यात घेतलं. पकडल्यानंतर महिलेने स्वतःला वाचवण्यासाठी तिचा मुलगा आजारी आहे, म्हणून चोरी केल्याचं म्हटलं.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरी करण्यासाठी आलेली महिला नशेत होती. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. व्हिडिओच्या शेवटी, ही महिला तिच्या कृत्याबद्दल माफी मागतानाही दिसत आहे. यावर लोकांनीही आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. चोर तर चोर वर शिरजोर, चांगल्या कुटुंबातील दिसते पण तरीही चोरी केली असं म्हणत आहेत.