संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 18:06 IST2025-10-12T17:23:55+5:302025-10-12T18:06:59+5:30
मथुरा येथे एका तरुणाला लैगिंक अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. या तरुणाने एका महिलेला प्रेमानंद महाराजांची भेट घालून देण्याच्या बहाण्याने बोलावले होते.

संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मथुरा येथे श्रद्धेच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. वृंदावनातील राधा निवास येथे राहणाऱ्या एका तरुणाने आग्रा येथील एका महिलेला आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्याशी खाजगी भेटीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्यांची घटना समोर आली. महिलेच्या तक्रारीवरून, आरोपी सुंदरम राजपूत याला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ सप्टेंबर रोजी घडली. पीडित महिलेला आध्यात्मिकतेची आवड आहे. वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद जी महाराज यांची अनुयायी आहे. तिची आरोपी सुंदरम राजपूतशी सोशल मीडियावर ओळख झाली. त्यांची ओळख मैत्रीत झाली. आरोपीने पीडितेला महाराजांच्या भक्तांपैकी एक असल्याचे सांगितले. महाराजांची वैयक्तिक भेट करुन देतो असे त्याने महिलेला सांगितले.
१० ऑगस्ट रोजी सुंदरमने महिलेला एक मेसेज पाठवला, यामध्ये त्याने तिच्यासाठी थेट दर्शनाची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. जवळजवळ एक महिन्यानंतर, १२ सप्टेंबर रोजी, त्याने महिलेला सांगितले की भेटीची व्यवस्था करण्यात आली आहे. ती महिला तिच्या भावासह वृंदावनला आली. आरोपीने महाराजांचा आश्रम खूप दूर असल्याचे सांगितले. तेथे वाहने जाऊ शकत नाहीत, म्हणून तिच्या भावाला पार्किंगमध्ये गाडीसह राहायला सांगितले.
आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
आरोपी महिलेला बाईकवरुन घेऊन गेला. पण तिला आश्रमात नेण्याऐवजी तो तिला राधाकृष्ण धाम नावाच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने कॉफी मागवली आणि त्यात ड्रग्ज मिसळले. कॉफी प्यायल्यानंतर ती महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
शनिवारी दुपारी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुंदरमला देवराहा बाबा घाट रोडवरून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिस आता घटनेशी संबंधित डिजिटल पुरावे गोळा करत आहेत. आरोपीने केलेले व्हिडीओ आणि चॅट रेकॉर्डिंग जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.