प्रोफेसर महिलेला ५० लाखांचा चुना! स्वतःला 'अनाथ' सांगून महिलांना जाळ्यात ओढणारा 'असा' अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:56 IST2026-03-26T14:55:48+5:302026-03-26T14:56:36+5:30

लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ४० हून अधिक उच्चशिक्षित महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सराईत भामट्याला अहमदाबाद पोलिसांनी इंदूरमधून बेड्या ठोकल्या आहेत.

Woman professor cheated of Rs 50 lakhs! man who lured women into a trap by calling himself an 'orphan' gets caught | प्रोफेसर महिलेला ५० लाखांचा चुना! स्वतःला 'अनाथ' सांगून महिलांना जाळ्यात ओढणारा 'असा' अडकला

प्रोफेसर महिलेला ५० लाखांचा चुना! स्वतःला 'अनाथ' सांगून महिलांना जाळ्यात ओढणारा 'असा' अडकला

सध्याच्या काळात ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईट्सवर जोडीदार शोधणे किती महागात पडू शकते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ४० हून अधिक उच्चशिक्षित महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सराईत भामट्याला अहमदाबाद पोलिसांनी इंदूरमधून बेड्या ठोकल्या आहेत. अमित नवीन चौबे असे या आरोपीचे नाव असून, तो स्वतःला मोठा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगून महिलांची शिकार करायचा.

असा फसला जाळ्यात...

अमित चौबे याने केवळ गुजरातच नव्हे, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील महिलांनाही आपल्या जाळ्यात ओढले होते. अहमदाबादमधील एका ३३ वर्षीय महिला प्रोफेसरची त्याने ५० लाखांना फसवणूक केली होती. मात्र, या प्रोफेसर महिलेने हार न मानता स्वतः या ठकाचा माग काढला. त्याचा मोबाईल नंबर, पत्ता आणि मेल आयडी शोधून त्यांनी पोलिसांना दिला. तो इंदूरमधील एका कॅफेमध्ये एका तरुणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

भावनिक कथा रचण्यात होता तरबेज

अमित चौबे हा अत्यंत हुशार गुन्हेगार आहे. तो प्रामुख्याने विधवा किंवा घटस्फोटित व्यावसायिक महिलांना टार्गेट करायचा. स्वतःला अनाथ असल्याचे सांगून तो महिलांची सहानुभूती मिळवायचा. त्यानंतर 'वडिलांचा अपघात झाला आहे', 'बहिणीचे लग्न आहे' किंवा 'घरावर ईडीचा छापा पडला असून खाती सील झाली आहेत' अशा बनावट कथा रचून तो महिलांकडून पैसे उकळायचा.

प्रोफेसर महिलेची ५० लाखांची लूट

तक्रारदार महिला प्रोफेसरच्या पतीचे २०२२ मध्ये निधन झाले होते. आईने लग्नासाठी त्यांची प्रोफाईल मॅट्रिमोनियल साईटवर टाकली होती. तिथेच अमितने त्यांच्याशी संपर्क साधला. स्वतःला इंदूर महापालिकेचा मोठा कॉन्ट्रॅक्टर सांगत त्याने मुंबईत १८ कोटींचे घर असल्याचे भासवले. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने टेंडर पास करणे, मेडिकल इमर्जन्सी आणि ईडी धाडीचे कारण सांगून या महिलेकडून तब्बल ५० लाख रुपये उकळले.

अजूनही १० महिला संपर्कात होत्या!

पोलिसांनी जेव्हा अमितला अटक केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. अटक झाली त्या दिवशीही तो तब्बल १० महिलांच्या सतत संपर्कात होता. त्याने आतापर्यंत ४० हून अधिक महिलांना कोट्यवधी रुपयांना लुटल्याचा संशय आहे. या आंतरराज्यीय टोळीचा किंवा या प्रकरणाचा अधिक तपास आता सोला हायकोर्ट पोलीस करत आहेत.

Web Title : मैट्रिमोनियल साइट से प्रोफेसर महिला को 50 लाख का चूना

Web Summary : एक सिविल ठेकेदार बनकर ठग ने मैट्रिमोनियल साइटों के माध्यम से 40 से अधिक शिक्षित महिलाओं को धोखा दिया। उसने भावनात्मक रूप से कहानियाँ बनाकर उनसे पैसे वसूले। 50 लाख की ठगी की शिकार एक प्रोफेसर ने उसे खोज निकाला, जिससे उसकी गिरफ्तारी हुई।

Web Title : Conman dupes professor of ₹50 lakh via matrimonial site.

Web Summary : A conman posing as a civil contractor was arrested for defrauding over 40 educated women via online matrimonial sites. He emotionally manipulated them, fabricating stories to extract money. One professor, cheated of ₹50 lakh, tracked him down, leading to his arrest.