ग्वाल्हेर शहरात एका महिलेने भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या मुलावर छळाचा गंभीर आरोप करत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने तिची व्यथा मांडणारी सुसाईड नोट लिहिली. "मंत्री आरोपीच्या वडिलांच्या पाया पडतात, म्हणून कोणीही त्यांना काहीही करू शकत नाही" असं म्हटलं आहे. हाजिरा पोलीस स्टेशन परिसरातील बिर्ला नगर येथे ही घटना घडली आहे.
बिर्ला नगर येथील रहिवासी वर्षा जादौन हिने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी वर्षाने तिच्या ४ वर्षाच्या मुलाला घराबाहेर पाठवलं होतं. सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूसाठी लोकेंद्र शेखावत जबाबदार असल्याचं सांगितलं."लोकेंद्र मला आणि माझ्या मुलाला मारण्याची धमकी देतो. तो एक वर्ष माझ्यासोबत राहिला, पण आता तो लग्न करण्यास आणि माझ्यासोबत राहण्यास नकार देतो."
"माझ्या मुलाला मारण्याची धमकी देत आहे. लोकेंद्र म्हणतो की, माझे वडील नेता आहेत, मंत्रीही त्यांच्या पाय पडतात, तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस. मी तुझं संपूर्ण खानदान संपवेन" असं वर्षान सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. पोलिसांनी ही सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे आणि गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
सीएसपी नागेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. लोकेंद्र शेखावत हा भाजपाचे माजी नगरसेवक ओमप्रकाश शेखावत यांचा मुलगा असल्याचं सांगितलं जात आहे, तर वर्षा तिच्या चार वर्षांच्या मुलासोबत राहत होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.