जीवे मारण्याची धमकी दिल्याची महिलेची तक्रार; भाजप आमदार गणेश नाईकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 18:56 IST2022-04-16T18:55:44+5:302022-04-16T18:56:26+5:30
सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात महिलेनं नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

जीवे मारण्याची धमकी दिल्याची महिलेची तक्रार; भाजप आमदार गणेश नाईकांवर गुन्हा दाखल
भाजपचे आमदार गणेश नाईक (BJP Ganesh Naik) यांच्यावर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेनं सीबीडी बेलापूर पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तसंच संबंधित महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरणी त्यांच्याविरोधात महिला आयोगाकडेही धाव घेतली होती. यानंतर आता गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गणेश नाईक यांनी २०२१ मध्ये आपल्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला होता. तसंच गणेश नाईक यांच्यासोबत आपण २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असून त्यांच्यापासून एक मुलगाही असं त्या महिलेनं म्हटलं. मुलाला त्यांचं नाव दिलं जावं अशी मागणी केल्यानंतर त्यांनी आपल्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोपही महिलेनं केला.
महिला आयोगाकडून दखल
या प्रकरणी महिलेनं पोलिसांत गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नसल्यानं त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेतली. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना यानंतर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले होते. या प्रकरणी शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनीदेखील गणेश नाईकांनी डीएनए चाचणी करून यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे.