महिलेने काकी अन् भावाला जिवंत जाळले; या घटनेमागील कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 18:07 IST2021-12-17T18:07:18+5:302021-12-17T18:07:58+5:30
Woman burnt her aunt and brother alive : घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आरोपी महिलेला बेदम मारहाण केली, नंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.

महिलेने काकी अन् भावाला जिवंत जाळले; या घटनेमागील कारण ऐकून बसेल धक्का
पाटणा : बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील नौबतपूर पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेने तिच्या काकी आणि भावाला जिवंत जाळल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आरोपी महिलेला बेदम मारहाण केली, नंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.
काकू आणि भावाला जिवंत का जाळले?
गुरुवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नौबतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करणपुरा गावात जमीन विक्रीच्या पैशांवरून झालेल्या वादात एका महिलेने तिची काकी आणि चुलत भावाला एका खोलीत बंद केले आणि त्यांना जिवंत जाळले. याची खबर मिळताच ग्रामस्थांनी कसं तरी वाचवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. ७० वर्षीय शांती देवी आणि त्यांचा मुलगा अविनाश कुमार अशी मृतांची नावे आहेत.
संतप्त जमावाने आरोपी महिलेला बेदम मारहाण केली
या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी आरोपी महिला माधुरी देवीला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी महिला माधुरी देवीची जमावाच्या तावडीतून कशी तरी सुटका केली.
पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले
नौबतपूर स्टेशन प्रभारी अनुराग दीपक यांनी सांगितले की, दोन्ही मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवले असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गावातील लोकांनी सांगितले की, मृत शांती देवी हिचा तिच्या पुतणीसोबत मालमत्तेवरून वाद होता, यावरून दोघांमध्ये कडाक्याने भांडण झाले. असे सांगितले जात आहे की, आरोपी महिलेलाही तिच्या नावावर काही जमीन मिळवायची होती, परंतु मृतक त्यासाठी तयार नव्हते. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.