'इन्स्टाग्रामवरुन आम्हाला धमक्या येत आहेत'; पती-पत्नी पोहोचले पोलीस ठाण्यात, चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:49 IST2025-08-08T15:49:05+5:302025-08-08T15:49:43+5:30
हरियाणामध्ये पतीला इन्स्टाग्रामद्वारे धमकावणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

'इन्स्टाग्रामवरुन आम्हाला धमक्या येत आहेत'; पती-पत्नी पोहोचले पोलीस ठाण्यात, चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य
Haryana Crime: हरियाणाच्या गुरुग्राम सायबर पोलीस ठाण्याने एका धक्कादायक प्रकरणाची उलघडा करून एका महिलेला अटक केली. महिलेने स्वतःला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यासाठी बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले होते. मात्र तिने केलेल्या एका चुकीमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली आणि हे प्रकरण उघडकीस आलं. या सगळ्या प्रकारानंतर पतीला जबर धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे.
गुरुग्राममध्ये एका महिला तिच्या पतीला बनावट इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे वारंवार धमकावून पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी त्याच्यासोबत गेली होती. तक्रारीत तिने आरोप केला की तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. महिलेने पोलिसांना सांगितले की या धमक्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून येत आहेत. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीनंतर समोर आलं की या धमक्या देणारी दुसरी कोणी नसून तीच महिला होती ज्याने तक्रार दाखल केली होती.
गुरुग्रामच्या सायबर विभागाने ६ ऑगस्ट रोजी महिलेला अटक केली. प्रिया मिश्रा असे या महिलेचे नाव आहे. ती सोहना येथील एका सोसायटीत राहते. तिचा पतीशी काही कारणांवरुन वाद सुरू होता. पतीला धडा शिकवण्यासाठी बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून ती हे सर्व करत होती. या संदर्भात २९ जुलै रोजी सायबर क्राइम साउथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र तपासादरम्यान, पत्नीच पतीला धमक्या देत असल्याचे समोर आलं.
चौकशीदरम्यान प्रिया मिश्राने एका महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केल्याची कबुली दिली. तिने सांगितले की तिचा पतीसोबत वैवाहिक वाद सुरू होता. तिने स्वतःला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया मिश्राकडून धमकी देण्यासाठी वापरलेला मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.