तृणमूल नेत्याविरुद्ध साक्ष द्यायला जाताना साक्षीदाराचा अपघात; दोघांचा मृत्यू, जेलमधून हत्येचा कट रचल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:56 IST2025-12-10T16:55:32+5:302025-12-10T16:56:19+5:30
संदेशखाली प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

तृणमूल नेत्याविरुद्ध साक्ष द्यायला जाताना साक्षीदाराचा अपघात; दोघांचा मृत्यू, जेलमधून हत्येचा कट रचल्याचा आरोप
Sandeshkhali Violence: पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याशी संबंधित प्रकरणातील आणि तुरुंगात असलेल्या तृणमूल काँग्रेस नेते शाहजहां शेख यांच्या विरोधात मुख्य साक्षीदाराच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात साक्षीदार असलेल्या भोलानाथ घोष यांच्या मुलाचा आज कोर्टात जात असताना झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली असून, हा पूर्वनियोजित हत्येचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ट्रक-कारची धडक, दोन ठार
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बसंती महामार्गावर बोयारमारीजवळ हा अपघात झाला. भोलानाथ घोष, त्यांचा मुलगा आणि कारचालक हे खासगी कारमधून बशीरहाट उप-विभागीय न्यायालयात एका वेगळ्या खटल्याच्या सुनावणीसाठी जात होते. दुसऱ्या दिशेने येणाऱ्या एका रिकाम्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत भोलानाथ यांचा मुलगा सत्यजित घोष (३२) आणि कारचा चालक शाहानूर मोल्ला (२७) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकने खासगी कारला फरफटत नेले आणि रस्त्यालगतच्या जलाशयात ढकलून दिले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.
साक्षीदार गंभीर जखमी, शाहजहां शेखवर हत्येचा आरोप
या अपघातात साक्षीदार भोलानाथ घोष हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी एसएसकेएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. भोलानाथ घोष यांचे मोठे पुत्र विश्वजित घोष यांनी थेट आरोप केला की, हा त्यांच्या वडिलांच्या हत्येचा सुनियोजित कट होता. विश्वजित यांनी आरोप केला आहे की, जेलमध्ये बसून शाहजहां शेखने हे सर्व घडवून आणले.
कोर्टातील सुनावणीसाठी जात असताना दुर्घटना
भोलानाथ घोष हे त्यांचे पुत्र सत्यजित यांच्यासह बशीरहाट उप-विभागीय न्यायालयात जात होते, कारण शाहजहां शेख यांनी त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या अनेक प्रकरणांपैकी एका खटल्याची सुनावणी होती. स्थानिकांनी सांगितले की, ट्रक अत्यंत वेगाने आला आणि कारला चिरडून जलाशयापर्यंत घसरत घेऊन गेला. ट्रक रस्त्याच्या कडेला पाण्यात लटकलेल्या अवस्थेत आढळला, मात्र ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.
बशीरहाटचे पोलीस अधीक्षक हुसैन मेहदी रहमान यांनी जखमींना रुग्णालयात हलवल्याची माहिती दिली. दरम्यान, या घटनेसंदर्भात पीडित कुटुंबाकडून अद्याप अधिकृत पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, या संशयास्पद अपघातामुळे सीबीआय चौकशीची जोरदार मागणी केली जात आहे.