बायकोच्या मदतीनं प्रेयसीचं छाटलं मुंडकं, थरकाप उडवणारी अनैतिक 'लव्ह स्टोरी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 14:31 IST2022-03-02T14:29:31+5:302022-03-02T14:31:22+5:30
Murder Case : सुहागिनी रामवीर सिंह असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे.

बायकोच्या मदतीनं प्रेयसीचं छाटलं मुंडकं, थरकाप उडवणारी अनैतिक 'लव्ह स्टोरी'
लखनऊ - एका विवाहित तरुणाने आपल्या पत्नीच्या मदतीने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणानं आपली पत्नी आणि मित्राच्या मदतीनं आधी प्रेयसीचा गळा आवळला. नंतर शिर धडावेगळं करत मृतदेह यमुना नदीत फेकून दिला. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर ही हत्येची थरारक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुहागिनी रामवीर सिंह असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे.
सुहागिनी उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्याच्या वैदपुरा परिसरातील खरदूली गावातील रहिवासी होती. या प्रकरणी पोलिसांनी मोहन, त्याची पत्नी आणि मित्र यांना अटक केली आहे. आरोपी मोहन हा जेसीबी चालक असून तो विवाहित आहे. २०१९ साली त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी तो वैदपुरा परिसरातील खरदूली गावात कामानिमित्त जायचा. त्यामुळे अनेकदा कामाच्या ठिकाणीच तो मुक्काम करत असे. दरम्यान त्याची ओळख २१ वर्षीय तरुणी सुहागिनीशी झाली. यानंतर दोघांत प्रेमसंबंध जुळले. दोघांचे प्रेमप्रकरण काही दिवस सुरु होते. नंतर सुहागिनीने मोहनकडे लग्नासाठी तगादा लावला. तसेच लग्न न केल्यास पोलिसांत तक्रार करेल अशी धमकी सुहागिनीनं दिली. यामुळे आरोपी मोहन काळजीत पडला होता. यानंतर त्याने आपलं लफडं पत्नीला सांगितला आणि सुहागिनीच्या हत्येचा कट रचला.
७ फेब्रुवारी रोजी मोहननं सुहागिनीला फूस लावून बादपुरा भागातील यमुना नदीवरील रेल्वे पुलावर घेऊन गेला. तिथे आधीपासून मोहनची पत्नी आणि त्याचा मित्र राहुल उपस्थित होते. या सर्वांनी मिळून सुहागिनीची स्कार्फने गळा आवळून हत्या केली. यानंतर तिघांनीही चाकूनं तिचा गळा कापून शिर धडावेगळं केलं. नंतर आरोपीने मृत तरुणीचे शिर आणि धड यमुना नदीत टाकून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत हत्येचं गूढ उलगडलं आहे. आरोपींना अटक केली असून तिन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.