Will Vijay Mallya, Nirav Modi depart in Taloja jail? | विजय मल्ल्या, नीरव मोदी यांची रवानगी होणार तळोजा कारागृहात ?
विजय मल्ल्या, नीरव मोदी यांची रवानगी होणार तळोजा कारागृहात ?

ठळक मुद्देभारताला पाहिजे असलेले आरोपी मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांचे भारतात प्रत्यापर्ण झाल्यास त्यांनाही तळोजा जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं.मुंबईत फक्त तळोजा कारागृहातच मोकळी जागा उपलब्ध असल्याने या विशेष कारागृहासाठी तळोजा कारागृहात पाहणी करण्यात आली आहे.

आर्थिक घोटाळ्यांमध्ये अडकलेले आरोपी हे उच्चभ्रू असल्याने या आरोपींना इतर सराईत गुन्हेगारांसोबत कारागृहात ठेवणं धोकादायक असल्यामुळेच अशा व्हीआयपी आरोपींसाठी विशेष कारागृह बनविण्याची मागणी कारागृह प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यानंतर या विशेष कारागृहासाठी नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशात पळून गेलेले आणि भारताला पाहिजे असलेले आरोपी मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांचे भारतात प्रत्यापर्ण झाल्यास त्यांनाही तळोजा जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं.

पीएनबी बँकेची १३ हजार कोटी रुपयांना फसवणूक करून भारताबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला भारतात आणण्याचे तपास यंत्रणांनी सर्व प्रयत्न सुरू आहेत. लंडनच्या वेस्टमिन्स्टरच्या कोर्टाने त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली असली तरी लंडनमधून आलेल्या अधिकाऱ्यांनी आरोपींना ठेवण्यात येणाऱ्या आर्थर रोड कारागृहाची पाहणी केल्यानंतर कारागृहातील व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. कुख्यात गुंड अबू सालेमनेही मुंबईतील कारागृह व्यवस्थेबाबत पोर्तुगाल सरकारचं लक्ष वेधलं होते. लंडनमधील कारागृहातील आरोपींना व्यायामासाठी आणि मनोरंजनासाठी ठराविक वेळेत बाहेर येण्याची परवानगी मिळते. त्याला स्वच्छ पाणी, वैद्यकीय सुविधा, शौचालय आणि कपडे धुण्याची सुविधा मिळते. नियमीत सुनावणीसाठी व्हिडिओ काॅन्फरसिंगची देखील सुविधा आहे. ही बराक अत्यंत सुरक्षित असल्याने तसंच बराकीबाहेर प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात असल्याने आरोपीला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, असं लंडन प्रशासनाने नीरव मोदी प्रकरणात आर्थर रोड कारागृहाला पाठवलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं.

दरम्यान, विजय मल्ल्यासह नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिल्यास त्याला कुठल्या तुरूंगात ठेवण्यात येईल, त्या तुरुंगात काय सुविधा असतील याची माहिती लंडन कोर्टाने मागवली होती. आर्थर रोड कारागृहातील या खोलीचा आकार २५ बाय १५ फूट एवढा असून इतर खोल्यांच्या तुलनेत या खोलीचा आकार मोठा आहे. या खोलीत ३ पंखे ६ ट्युबलाईट असून खोलीला २ खिडक्याही आहेत. त्यानुसार ही खोली प्रकाशमान आणि हवेशीर आहे. कैद्याला आपलं खासगी सामान ठेवण्यासाठी खोलीत स्टोरेजची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचं कळवलं होतं. मात्र, लंडन प्रशासनाकडून त्यातही अनेक त्रुटी काढल्या होत्या. या माहितीनंतर आर्थिक घोटाळ्यातील आरोपींसाठी स्वतंत्र कारागृह बांधण्यात येण्याबाबतच्या प्रस्तावाकडे गृह विभागाने लक्ष वेधलं. त्यानुसार मुंबईत फक्त तळोजा कारागृहातच मोकळी जागा उपलब्ध असल्याने या विशेष कारागृहासाठी तळोजा कारागृहात पाहणी करण्यात आली आहे.

लंडनमधील कारागृहांची रचना कशा प्रकारे आहे, व्हीआयपी आरोपींंची कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे, काय काय सुविधा तेथील कारागृहातील आरोपींना दिल्या जातात, याची पाहणी करण्यासाठी लवकरच कारागृह आणि गृह प्रशासनातील अधिकारी लंडनला भेट देणार आहेत. त्यानुसार कारागृहांची बांधणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Web Title: Will Vijay Mallya, Nirav Modi depart in Taloja jail?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.