पत्नीचा गळा चिरला, मग उकळते तेल टाकले; चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 15:00 IST2023-05-15T14:59:52+5:302023-05-15T15:00:20+5:30
शांत डाेक्याने रचला कट...

पत्नीचा गळा चिरला, मग उकळते तेल टाकले; चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या
अहमदपूर (जि. लातूर) : चारित्र्याच्या संशयावरून शिक्षकाने पत्नीचा कत्तीने गळा चिरला, हातावर व पाठीवर सपासप वार केले. त्यानंतर उकळते तेल अंगावर टाकून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना अहमदपुरात घडली. याबाबत पाेलिसात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांच्या माहितीनुसार, हालसी (ता. निलंगा) येथील वैजनाथ दत्तात्रय सूर्यवंशी (४३) हा शिक्षक खंडाळी (ता. अहमदपूर) येथील जिल्हा परिषद शाळेत आहे. अहमदपुरात तो पत्नी शामल (वय ३५), ११ आणि ९ वर्षांच्या दोन मुलींसह वास्तव्याला होता. काही दिवसांपूर्वी त्याने मोठी मुलगी छत्रपती संभाजीनगरला भावाकडे शिक्षणासाठी पाठविली होती. सध्या घरात पती-पत्नी व ९ वर्षांची मुलगी राहत हाेते.
वैजनाथ पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यामध्ये वाद होत असत. सततच्या मारहाणीने त्रस्त पत्नी यापूर्वी तक्रार देण्यासाठी पाेलिसात गेली होती. मात्र, नातेवाइकांनी समजूत काढल्यानंतर तिने तक्रार मागे घेतली हाेती. त्यानंतरही दाेघांमधील वाद सुरुच राहिले.
शांत डाेक्याने रचला कट
- १२ मे राेजीच्या रात्री वैजनाथने मुलीला आतल्या खोलीत झोपविले.
- पत्नी आणि तो हॉलमध्ये झोपले.
- रात्री त्याने बायकोचा कत्तीने गळा चिरला.
- अंगावर कत्तीने वार करून उकळते तेल टाकले.
- तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने घरातून धूम ठाेकली.
दुधवाल्यामुळे कळले
पहाटे दुधवाला घरी आला. त्याने आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्याने दरवाजा ढकलताच हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला.