पत्नीच्या कथित प्रेमसंबंधांमुळे आणि सततच्या मानसिक छळामुळे त्रस्त झालेल्या एका तरुणाने आपले आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातीलवाराणसीमध्ये राहणाऱ्या तरुणाने मृत्यूपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात त्याने स्वतःच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेने कायद्याच्या गैरवापरावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
व्हिडीओमध्ये काय म्हणाला तरुण?
राहुल मिश्रा असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लोहटा येथील घरात राहुलच्या कुटुंबीयांना त्याचा मृतदेह फाशीला लटकलेला आढळला. तपासणीदरम्यान पोलिसांनी राहुलचा मोबाईल जप्त केला, ज्यात ७ मिनिटे २९ सेकंदांचा एक व्हिडीओ सापडला. या व्हिडिओमध्ये राहुलने अत्यंत भावनिक अपील केले आहे. तो म्हणाला, "मला जगायचे होते; पण मी माझ्या मुलाशिवाय जगू शकत नव्हतो. ज्या पत्नीवर मी खूप प्रेम केले, ती दुसऱ्या कोणासोबत राहू इच्छिते! मला सरकारला विचारायचे आहे की, फक्त मुलींवरच अन्याय होतो का? मुलांवर होतो तो अन्याय नाही का? कलम ४९८मुळे मी माझा जीव घेत आहे. सरकारने त्यात सुधारणा करावी."
त्याने पुढे सांगितले की, तो त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करतो, पण तिला शुभम सिंग डेंजर नावाच्या प्रियकरासोबत संबंध ठेवायचे आहेत. "मला माहिती आहे की तो माझ्या पत्नीला ओयोला घेऊन जातो. माझ्यासाठी हे असह्य आहे," असे त्याने म्हटले.
पत्नीवर छळाचे गंभीर आरोप
राहुल मिश्राने व्हिडीओमध्ये पत्नीच्या प्रियकर शुभमचे नाव घेतले आहे. पत्नी त्याला मुलालाही भेटू देत नव्हती, ज्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होता. पत्नीच्या सततच्या छळामुळे आणि अवैध संबंधांमुळे त्याने पोलीस स्टेशन आणि कोर्टाचे खेटे घालून तो थकला होता.
सरकारला कळकळीचे आवाहन
जीवनयात्रा संपवण्यापूर्वी राहुल मिश्राने हुंडाविरोधी कायद्याचा (कलम ४९८) होणारा गैरवापर हे त्याच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. त्याने सरकारला विनंती केली की, २०१४ पासून अशी मानसिकता निर्माण झाली आहे की, फक्त पुरुषच दोषी असतात. त्यामुळे सरकारने कलम ४९८ मध्ये तातडीने सुधारणा करावी.
पत्नी आणि सासूला अटक
राहुल मिश्राच्या आईने त्याच्या आत्महत्येसाठी त्याची पत्नी आणि सासूला जबाबदार धरत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. व्हिडीओतील गंभीर आरोपांच्या आधारे पोलिसांनी राहुलची पत्नी आणि सासू या दोघांनाही अटक केली आहे.