पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:20 IST2025-09-17T14:19:36+5:302025-09-17T14:20:06+5:30
पत्नीसोबत संबंध ठेवणाऱ्या एका व्यक्तीची पतीनेच हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून हत्येचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पत्नीसोबत संबंध ठेवणाऱ्या एका व्यक्तीची पतीनेच हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. मृत व्यक्तीची ओळख रमनजिनयुलु म्हणून झाली असून, ते गुंटूर शहरातील सीतम्मा कॉलनीमध्ये राहत होते आणि ट्रॅक्टर चालकाचे काम करत होते. ६ सप्टेंबरला रमनजिनयुलु घरातून बाहेर गेले, पण परतलेच नाहीत.
पत्नीने पोलिसांवर आरोप केले
रमनजिनयुलु परत न आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनी त्यांची बेपत्ता असल्याची नोंद केली. त्यानंतर रमनजिनयुलु यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, त्यांना याच कॉलनीतील कोंडैया नावाच्या व्यक्तीवर संशय आहे. मात्र, १० दिवस उलटूनही रमनजिनयुलु यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
यामुळे संतप्त झालेल्या रमनजिनयुलु यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. 'माझे पती १० दिवसांपासून बेपत्ता आहेत. ते जिवंत आहेत की मृत, हे आम्हाला माहीत नाही आणि नगरमपालेम पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत,' असा आरोप त्यांच्या पत्नीने केला.
त्यानंतर गुंटूर पश्चिमचे डीएसपी अरविंद आणि संयुक्त कलेक्टर आशुतोष श्रीवास्तव यांनी निदर्शकांची भेट घेतली आणि संध्याकाळपर्यंत या प्रकरणाचा खुलासा करण्याचे आश्वासन दिले.
चौकशीत हत्येचा खुलासा
पोलीस तपासाला वेग आल्यानंतर, रमनजिनयुलु यांच्या पत्नीने संशय व्यक्त केलेल्या कोंडैयाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, कोंडैयाने रमनजिनयुलुची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कोंडैयाने रमनजिनयुलुचा मृतदेह अड्डांकी येथील एका तलावात फेकून दिला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तो मृतदेह बाहेर काढला. कोंडैयाने सांगितले की, रमनजिनयुलुचे त्याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध सुरू होते, त्यामुळेच त्याने रमनजिनयुलुला संपवण्याचा कट रचला.
६ तारखेला तो रमनजिनयुलुला शहराबाहेर घेऊन गेला. तिथे त्याला दारू पाजली आणि त्यानंतर त्याची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेह एका कारमधून अड्डांकी येथे नेऊन तलावात फेकून दिला. पोलिसांनी आरोपी कोंडैयाला अटक केली असून, या प्रकरणात त्याला आणखी कोणी मदत केली होती का, याचा तपास करत आहेत.