डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:16 IST2025-09-24T09:13:53+5:302025-09-24T09:16:24+5:30
एका महिलेवर तब्बल ४० ते ४५ वेळा चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. सुरुवातीला ही घटना लुटमारीच्या उद्देशाने झाल्याचे भासवण्यात आले.

डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील खंडवामध्ये उघडकीस आली आहे. या भागात राहणाऱ्या एका पतीनेच आपल्या पत्नीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. हत्येचे कारणही धक्कादायक असून, याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पतीसह तिघांना अटक केली आहे.
नेमके काय घडले?
२१ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास खंडवा जिल्ह्यातील डिगरिस गावात एक भयानक घटना घडली. एका महिलेवर तब्बल ४० ते ४५ वेळा चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. सुरुवातीला ही घटना लुटमारीच्या उद्देशाने झाल्याचे भासवण्यात आले. हल्लेखोरांनी महिलेचा पती महेंद्र यालाही किरकोळ जखमी केले.
पोलिसांना संशय कसा आला?
पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, पती महेंद्रच्या जबाबात विसंगती आढळून आली. त्याने रात्री पोटदुखीचे नाटक करून पत्नीला सोबत घेऊन दवाखान्यात जाण्याचा बहाणा केला होता. पोलिसांनी डॉक्टरांकडून माहिती घेतली असता महेंद्र पूर्णपणे ठीक असल्याचे समोर आले. याच माहितीमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी महेंद्रची कसून चौकशी केली.
'क्राईम पेट्रोल' पाहून आखला कट
पोलिसी खाक्या दाखवताच महेंद्रने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानेच आपल्या पत्नीच्या हत्येसाठी एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले. महेंद्रने हेमंत उर्फ कान्हा आणि आर्यन यांच्यासोबत मिळून या हत्येचा कट रचला होता. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी 'क्राईम पेट्रोल' या टीव्ही शोचे अनेक एपिसोड पाहून हत्येचा कट आखला होता.
अनोळखी व्यक्तींकडून हत्या
महेंद्रच्या सांगण्यानुसार, रात्रीच्या वेळी एका निर्जन ठिकाणी त्याचे मित्र हेमंत आणि आर्यन आधीपासूनच लपून बसले होते. महेंद्र आणि त्याची पत्नी तिथे पोहोचताच दोघांनी हल्ला केला. लुटमारीचा बनाव करण्यासाठी त्यांनी महेंद्रला किरकोळ जखमी केले आणि त्यानंतर पत्नीवर तब्बल ४० ते ४५ वार करून तिची हत्या केली.
हत्येमागे हे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्रचे हे दुसरे लग्न होते. पत्नी वारंवार शिवीगाळ करत असल्यामुळे आणि तिचा कुटुंबासोबतचा व्यवहार ठीक नसल्यामुळे महेंद्र वैतागला होता. याच कारणामुळे त्याने पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला. या हत्येमध्ये वापरलेला चाकू आणि सुपारीपोटी दिलेले १० हजार रुपयेही पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणात राजेंद्र नावाचा चौथा आरोपी अजूनही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास करणार्या पदम नगर पोलिसांनी हेमंत उर्फ कान्हा, आर्यन आणि मुख्य आरोपी महेंद्र यांना अटक केली आहे.