UP Crime: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला गोमांस तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा धक्कादायक कट रचला होता. मात्र, या प्रकरणात ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा या महिलेला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच गुन्हा दाखल झाला आणि त्यांना निलंबित करण्यात आले. लखनऊ उच्च न्यायालयाच्या आवारात हा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
नेमकं प्रकरण काय?
आमिना खातून नावाच्या विवाहित महिलेचे इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या पतीला कायमचे रस्त्यातून हटवण्यासाठी या दोघांनी त्याला गोमांस तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन केला होता. प्रियकराने पतीच्या कारमध्ये २ किलो मांस ठेवून पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी पतीला अटक केली, पण महिनाभरात त्याला जामीन मिळाला. प्रियकराने खोट्या नावाने सोशल मीडियावर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या ग्रुपमध्ये प्रवेश केला होता. सप्टेंबरमध्ये लखनऊच्या हजरतगंज येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तिच्या पतीच्या एसयूव्हीमध्ये कथितरित्या २ किलो मांस ठेवले. त्या महिलेनेच त्याला गाडीच्या चाव्या दिल्या होत्या.
त्यानंतर पुन्हा एकदा दोघांनी मिळून पतीला अडकवण्याचा कट रचला. १४ जानेवारी २०२६ रोजी प्रियकराने १० किलो मांस ई-रिक्षाद्वारे पतीच्या कामाच्या ठिकाणी पाठवले आणि हिंदुत्ववादी संघटनांना याची माहिती दिली. पुन्हा पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आणि कारवाई सुरु केली.
CCTV फुटेजमुळे समोर आलं सत्य
आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय असल्याने त्याने घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. पोलिसांनी जेव्हा या फुटेजची तपासणी केली, तेव्हा सत्य समोर आले. पती बाथरूममध्ये असताना पत्नीने त्याचा फोन वापरून प्रियकराला माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सापळा रचून प्रियकराला अटक केली, मात्र आमिना खातून फरार होती.
कोर्टात पोलिसांची एन्ट्री आणि गोंधळ
सोमवारी १९ जानेवारी रोजी काकोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान खान, पोलीस अधिकारी लाखन सिंह आणि शिपाई पुष्पेंद्र सिंह यांना माहिती मिळाली की, आरोपी महिला उच्च न्यायालयात आपल्या एका वकील नातेवाईकाला भेटायला आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आमिनावर केवळ न्यायालयाबाहेर पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र अतिउत्साहात हे तिन्ही पोलीस कर्मचारी थेट वकिलाच्या चेंबरमध्ये घुसले. न्यायालयाच्या संवेदनशील परिसरात विनापरवाना प्रवेश केल्याने वकिलांनी संताप व्यक्त केला आणि मोठा गदारोळ झाला. या गोंधळाचा फायदा घेत आरोपी महिला तिथून पसार झाली.
पोलिसांवरच कारवाई
वकिलांच्या तक्रारीनंतर विभूतीखंड पोलीस ठाण्यात या तिन्ही पोलिसांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. डीसीपी विश्वजीत श्रीवास्तव यांनी तत्काळ कारवाई करत या तिन्ही पोलिसांना निलंबित केले आहे. "उच्च न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी कोणत्याही वॉरंट किंवा परवानगीशिवाय प्रवेश करणे नियमांचे उल्लंघन आहे. या प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Summary : In Lucknow, a woman conspired with her lover to falsely implicate her husband in beef smuggling. The plan involved planting meat in his car. However, the police who went to arrest the wife were suspended for unauthorized entry into court premises during the investigation.
Web Summary : लखनऊ में एक महिला ने प्रेमी संग मिलकर पति को गोमांस तस्करी में फंसाने की साजिश रची। मांस गाड़ी में रखवाया। पत्नी को पकड़ने गई पुलिस अदालत परिसर में बिना अनुमति घुसने पर निलंबित कर दी गई। जांच जारी है।