विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:22 IST2025-12-22T12:20:19+5:302025-12-22T12:22:30+5:30
विधवा वहिनीचे दिरासोबत होते अनैतिक संबंध; अचानक गायब झाली अन् एका महिन्यानंतर सापडला सांगाडा!

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधांमधून एका ४५ वर्षीय विधवा महिलेला आपला जीव गमवावा लागला. महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या या महिलेची दिरानेच गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. महिलेचा सांगाडा ऊसाच्या शेतात सापडल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
कुशीनगरच्या नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अंगद प्रसाद याने २९ नोव्हेंबर रोजी आपली आई सुनैना देवी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. २६ नोव्हेंबरपासून आई घरी परतली नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि महिलेच्या कॉल डिटेल्सवरून संशयाची सुई वसंत नावाच्या व्यक्तीकडे वळली.
मोबाईल लोकेशनने आरोपीचा पर्दाफाश
तपासादरम्यान पोलिसांना आढळले की, सुनैना देवीच्या मोबाईलचा वापर रामकोला येथील रहिवासी वसंत करत आहे. वसंत हा मृत महिलेचा नात्याने चुलत दीर लागत असे. घटनेच्या दिवशी दोघांचेही लोकेशन नौरंगिया परिसरात होते आणि सुनैना यांनी शेवटचा फोन वसंतलाच केला होता. सुरुवातीला वसंतने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला.
ऊसाच्या शेतात हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट
आरोपी वसंतने कबुली दिली की, २६ नोव्हेंबर रोजी त्याने सुनैना देवी यांना नौरंगिया येथील एका ऊसाच्या शेतात नेले आणि तिथे त्यांचा गळा आवळून खून केला. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस त्या शेतात पोहोचले असता तिथे मानवी कवटी, हाडे, साडी, चपला आणि महिलेचे केस सापडले.
मुलाने ओळखले आईचे अवशेष
घटनास्थळी मिळालेल्या साडी आणि चपलांवरून मुलगा अंगदने ही आपली आई असल्याचे ओळखले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून, सापडलेली हाडे आणि अवशेष तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
हत्येचे कारण: अनैतिक संबंध
खड्डा विभागाचे पोलीस उपअधीक्षक वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, "आरोपीने चौकशीदरम्यान अनैतिक संबंधांतून ही हत्या केल्याची कबुली दिली आहे." आरोपी वसंतला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.