एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:49 IST2025-08-25T19:37:05+5:302025-08-25T19:49:33+5:30
भिखारी सिंह म्हणाले की, "मोठी मुलगी कंचनने अनेकदा सांगितले होते की, निक्कीला सासरच्या मंडळींकडून मारहाण होते. जेव्हा कंचनने याचा विरोध केला, तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आली."

एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
ग्रेटर नोएडा येथील हुंड्याच्या बळी ठरलेल्या निक्की भाटी हिला जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर, तिच्या वडिलांचे दुःख प्रत्येक शब्दात जाणवत आहे. भिखारी सिंह यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देताना सांगितले, "आम्ही आमच्या कुवतीपेक्षा जास्त देऊन मुलींची लग्ने केली. स्कॉर्पियो, बुलेट, रोख रक्कम... एका शेतकऱ्याला जे काही शक्य आहे, ते सर्व आम्ही केले." समाजाने घालून दिलेल्या परंपरेचे पालन करत मुलींच्या आनंदासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण सासरच्या मंडळींच्या लोभीपणाने आणि क्रूरतेने त्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त केले.
मुलींच्या आनंदासाठी आम्ही सर्व काही केले!
वडिलांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलींना नेहमीच चांगले जीवन देण्याचा प्रयत्न केला. "आम्ही तिला कधीही बसमध्ये लटकू दिले नाही. नेहमी आमच्या गाडीतून पाठवले. डीपीएसमधून शिकवले. मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी प्रत्येक पाऊल उचलले. पण ज्या घरात त्यांनी मुलींना पाठवले, तिथून त्यांना केवळ वेदनाच मिळाल्या."
भिखारी सिंह म्हणाले की, "मोठी मुलगी कंचनने अनेकदा सांगितले होते की, निक्कीला सासरच्या मंडळींकडून मारहाण होते. जेव्हा कंचनने याचा विरोध केला, तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आली."
म्हणून पुन्हा मुलींना सासरी पाठवले!
परिस्थिती बिघडल्यावर अनेकदा त्यांनी मुलींना माहेरी बोलावले होते. "आम्ही आमच्या मुलींना घरी घेऊन आलो होतो, पण समाजाने आणि पंचायतीने हस्तक्षेप केला आणि मुलींना परत सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला." परिस्थिती सुधारेल, अशी आशा त्यांना होती, पण सासरच्या लोकांच्या स्वभावात काहीच बदल झाला नाही. निक्कीच्या सासूच्या वागणुकीवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "निक्कीची सासू तिचे केस ओढायची आणि मुलाकडून तिला मारहाण करायला लावायची. अशी आई मी पहिल्यांदाच पाहिली. एक आई असे कसे करू शकते?" असे ते म्हणाले.
एकाच घरात दोन मुलींची लग्ने का केली?
दोन मुलींची लग्ने एकाच घरात का केली, या प्रश्नावर भिखारी सिंह म्हणाले, "त्यांच्याकडे दोन मुले होती आणि आमच्याकडे दोन मुली. घर लहान होते, म्हणून दोन्ही बहिणी सोबत राहतील आणि आनंदी राहतील, असा विचार आम्ही केला. पण असे काही होईल, याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. आम्ही मुलींच्या चांगल्या भविष्याचे स्वप्न पाहिले होते, पण ते स्वप्न तुटले."
लग्नानंतरही हुंड्याची मागणी थांबली नाही. "आधी स्कॉर्पियो आणि बुलेट घेतली. नंतर कधी मर्सिडीज मागितली, तर कधी लाखोंची रोख रक्कम. त्यांनी ३६ लाख रुपयांची मागणीही केली होती. आमच्या मुली पार्लर चालवत होत्या, तिथूनही ते पैसे चोरू लागले. कोणतेही कामधंदा नाही, फक्त पैशांसाठी दबाव टाकायचे."