‘तुला वाटेल तेव्हा... ', नमाज पठणाच्या वेळेवरून एकास मारहाण; दोघे फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 13:23 IST2022-05-01T13:22:46+5:302022-05-01T13:23:40+5:30
Assaultig Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसिन पठाण हे पुणे नाक्यावरील एका मोबाईल शॉपीमध्ये होते.

‘तुला वाटेल तेव्हा... ', नमाज पठणाच्या वेळेवरून एकास मारहाण; दोघे फरार
संगमनेर (जि. अहमदनगर) : ‘तुला वाटेल तेव्हा तू नमाजाची वेळ का ठेवतो?’ असे म्हणत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकास लोखंडी टामी आणि चाकूने वार करत करीत जखमी केले. शनिवारी दुपारी पूना नाक्याजवळ (नाईकवाडपुरा) सव्वादोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मोसिन नासिरखान पठाण (वय ४०, रा. नाईकवाडपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साजीद मेहमूद शेख (रा.रहेमतनगर) व मजहर मेहबूब पठाण (रा.कब्रस्थान जवळ, नाईकवाडपुरा) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसिन पठाण हे पुणे नाक्यावरील एका मोबाईल शॉपीमध्ये होते. यावेळी दुचाकीवरून साजिद शेख व मजहर पठाण आले. या दोघांनी मोसिन यांस दमबाजी करीत आक्षेपार्ह शब्द वापरत शिवीगाळ केली.
मोसिन यांनी या दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनीही लोखंडी टामी मारहाण करत व चाकूने वार करीत जखमी केले. आसपासच्या नागरिकांनी मध्यस्थी केली व जखमी झालेल्या मोसिन पठाण यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
या बाबतची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीचा जवाब नोंदविला. त्यानुसार वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.