"पप्पा नसताना ३ काका घरी यायचे"; पत्नीने केले पतीचे तुकडे, १० वर्षांच्या लेकीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 15:24 IST2025-12-22T15:14:33+5:302025-12-22T15:24:41+5:30
एका महिलेने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने स्वतःच्या पतीची निर्घृण हत्या केली.

फोटो - tv9hindi
उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मेरठच्या सौरभ राजपूत प्रकरणासारखेच एक भयंकर हत्या प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने स्वतःच्या पतीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून ते पॉलिथिनमध्ये भरले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आता या प्रकरणात मृताच्या १० वर्षांच्या मुलीने धक्कादायक खुलासे केले आहेत. "माझ्या पप्पांना त्यांनीच मारलंय, माझ्या आईला आणि त्या तिन्ही काकांना फाशी द्या" अशी मागणी या मुलीने केली आहे.
राहुल १८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. त्याची पत्नी रुबी हिने २४ नोव्हेंबर रोजी कोतवाली चंदौसी येथे तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र, पोलिसांना सुरुवातीपासूनच पत्नीच्या वागण्यावर संशय होता. रविवारी पोलिसांनी पुन्हा घराची झडती घेतली असता स्कूटी, बॅग, टॉयलेट ब्रश, लोखंडी रॉड आणि इलेक्ट्रिक हिटर यांसारख्या वस्तू जप्त केल्या. याच हत्यारांनी राहुलची हत्या करून त्याचे तुकडे केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.
पोलिसांच्या मते हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ते विविध ठिकाणी फेकण्यात आले. सध्या पोलीस गायब असलेले हात, पाय आणि डोकं यांचा शोध घेत आहेत. पत्नी रुबी, तिचा बॉयफ्रेंड आणि अन्य एका आरोपीसह तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणात मृताच्या १० वर्षांच्या मुलीने दिलेला जबाब सर्वात महत्त्वाचा ठरला आहे.
मुलीने सांगितलं की, "आई आणि पप्पांमध्ये नेहमी भांडण व्हायचं. गौरव, सौरभ आणि अभिषेक नावाचे लोक आमच्या घरी यायचे. ते माझ्यासाठी चॉकलेट आणायचे. पप्पा घरी नसताना ३ अंकल आईला भेटायला घरी यायचे. अभिषेक नेहमी आईला म्हणायचा की, फक्त काही महिन्यांची गोष्ट आहे, मग तू माझीच आहेस. जेव्हा जेव्हा हे लोक घरी यायचे, तेव्हा मला आणि माझ्या भावाला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने खोलीबाहेर पाठवलं जायचं."
ज्या दिवशी ही हत्या झाली, त्या दिवशी दोन्ही मुलं शाळेत गेली होती. जेव्हा मुलं त्या तिघांना घरी येण्यापासून रोखायची, तेव्हा आई त्यांना धमकावायची. मुलीने स्पष्ट शब्दांत सांगितलं, "माझ्या आईला आणि त्या तिन्ही काकांना घेऊन जा, त्यांना फाशीची शिक्षा द्या." मुलीचा हा जबाब या प्रकरणात आता सर्वात मोठा पुरावा ठरत आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.