....जेव्हा दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री प्लास्टिक कंपन्यांवर टाकतात छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 20:45 IST2018-10-20T17:31:26+5:302018-10-20T20:45:42+5:30
चाकण परिसरातील दोन कंपन्यांवर दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी छापा टाकून धडक कारवाई केली.

....जेव्हा दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री प्लास्टिक कंपन्यांवर टाकतात छापा
हनुमंत देवकर
चाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खराबवाडी ( ता.खेड ) येथील आगरवाल पॅकेजिंग कंपनी व कुरुळी गावच्या हद्दीतील दुसरी मिताली पॅकेजिंग प्रा.लि. अशा दोन ठिकाणच्या कंपन्यांवर वर दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी छापा टाकून धडक कारवाई केली. त्यात पोलीस व महसूल यंत्रणेला कळवत कच्चा व पक्का असा अंदाजे चार मोठी गोडाऊन भरून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला आहे.
याबाबत कदम यांनी सांगितले की, चाकण-तळेगाव रस्त्यावरून दुपारी तीनच्या सुमारास जात असताना खराबवाडी गावच्या हद्दीत एक टेम्पो प्लॅस्टिक घेऊन चालला असता टेम्पो चालकाला हटकले.त्याने हा माल एका कंपनीतून आणला असून तो आगरवाल पॅकेजिंग कंपनीत नेत असल्याचे सांगितले.खराबवाडी येथील आगरवाल पॅकेजिंग ही कंपनी लोखंडी हौद उत्पादन करते, त्याचप्रमाणे प्लास्टिक उत्पादन व सॅनिटरी नॅपकिन बनविते. मंत्र्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्या चलनावरील पत्त्यावर थेट मंत्री कदम यांनी कंपनीत जाऊन धाड मारून कारवाई केली. याठिकाणी प्लॅस्टिक उत्पादन होत असल्याचे आढळले. या कंपनीत कच्चा व पक्का असा अंदाजे चार मोठी गोडाऊन भरून माल असून हा माल कोट्यवधी रुपयांचा आहे. मात्र, कंपनीचे अधिकारी हे उत्पादन ५० मायक्रोनच्या पुढे आहे, असे सांगतात.