व्हॉट्सॲपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग पडली महागात; क्षणात पावणेपाच लाख झाले गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 09:21 IST2025-10-13T09:21:26+5:302025-10-13T09:21:55+5:30
म्हणे कस्टरमर सपोर्ट: नीलेश हेमराज सराफ (४९, रा. अजय कॉलनी) यांच्या व्हाॅटस्ॲपवर एका मोबाइल क्रमांकावरून कस्टमर्स सर्व्हिस सपोर्ट ही एपीके फाइल आली. त्यावेळी त्यांच्या व्हॉटस्ॲपची सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’वर होती. त्यामुळे ही फाइल ॲटोमॅटिक डाऊनलोड झाली. आणि खात्यातून ४ लाख ६४, ४३९ रुपये वजा झाले.

व्हॉट्सॲपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग पडली महागात; क्षणात पावणेपाच लाख झाले गायब
जळगाव : मोबाइलमधील व्हॉट्सॲपची सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’वर असताना एपीके फाइल डाऊनलोड झाली आणि जळगावातील व्यावसायिकाच्या खात्यातून तब्बल ४ लाख ६४ हजार ४३९ रुपये गायब झाले. हा प्रकार ९ ऑक्टोबर रोजी घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल वायफायवर असताना ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग ठेवल्याने हा प्रकार घडला असून, सर्वच मोबाइल ग्राहकांनी आपल्या मोबइलचे सेटिंग तपासणे गरजेचे झाले आहे.
म्हणे कस्टरमर सपोर्ट: नीलेश हेमराज सराफ (४९, रा. अजय कॉलनी) यांच्या व्हाॅटस्ॲपवर एका मोबाइल क्रमांकावरून कस्टमर्स सर्व्हिस सपोर्ट ही एपीके फाइल आली. त्यावेळी त्यांच्या व्हॉटस्ॲपची सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’वर होती. त्यामुळे ही फाइल ॲटोमॅटिक डाऊनलोड झाली. आणि खात्यातून ४ लाख ६४, ४३९ रुपये वजा झाले.
फाइल डाऊनलोड होताच मोबाइलचा ॲक्सेस मिळतो
सराफ यांच्या मोबाइलमध्ये एपीके फाइल डाऊनलोड होताच अज्ञातने त्यांच्या मोबाइलचा ॲक्सेस मिळविला. त्यामुळे त्याला सर्व ओटीपी व इतर माहिती घेणे सहज शक्य झाले. खात्यातून पैसे काढले जात असल्याचे लक्षात येताच सराफ हे बँकेत गेले व खाते होल्ड केले. त्यामुळे उर्वरित रक्कम वाचली.
वायफायवर ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग टाळा
व्हाॅटस्ॲपवर काही फोटो, मेसेज अथवा काही व्हिडीओ आल्यास वायफायवर ‘ऑटो डाऊनलोड’ व्हावे म्हणून अनेक जण व्हॉटस्ॲपची सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’ ठेवत असतात. मात्र, केव्हा कोणती फाइल येईल व ती डाऊनलोड झाल्यास किती नुकसान होऊ शकते, हे सांगता येत नाही. त्यामुळे वायफायवर ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग टाळावी, सतीश गोराडे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे