राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ८ आरोपींना अटक केली आहे, ज्यात सोनम रघुवंशी, राज कुशवाह, राजचे तीन मित्र, प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्स, लोकेंद्र तोमर आणि एक सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. मेघालय पोलीस सध्या या प्रकरणाला अधिक मजबूत बनवणारे सर्व पुरावे शोधत आहेत. याच दरम्यान आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी सोनमची दोन मंगळसूत्र जप्त केली आहेत. सोनमने राजाशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न केलं होतं का? सोनम रघुवंशी आधीच विवाहित होती का? जर एक मंगळसूत्र राजाच्या नावाचं असेल तर दुसरं कोणाचं? सोनम आणि राजने लग्न केलं होतं का? असे अनेक प्रश्न मंगळसूत्रामुळे उपस्थित झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजाच्या हत्येनंतर सोनम ज्या फ्लॅटमध्ये लपली होती तिथून पोलिसांना ही दोन मंगळसूत्र सापडली. यातील एक मंगळसूत्र राजा रघुवंशीने सोनमला लग्नात घातलं होतं तर दुसरे राजने दिलं होतं असं सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत, आता पोलीस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की सोनमने राजाशी लग्न करण्यापूर्वी राजशी खरंच गुपचूप लग्न केलं होतं का?
राजा रघुवंशीच्या मोठ्या भावाने सोमवारी सांगितलं होतं की, मुख्य आरोपी सोनमला लग्नादरम्यान राजाच्या कुटुंबाने तब्बल १६ लाख रुपयांचे दागिने भेट दिले होते. मेघालय पोलिसांनी रविवारी मध्य प्रदेशातील रतलाम येथून महत्त्वाचे पुरावे म्हणून काही दागिने, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केल्यानंतर विपिन रघुवंशी यांनी हा दावा केला. सोनम रघुवंशीला सासरच्यांनी लग्नात १६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने दिल्याचे उघडकीस आल्यानंतर तपासात एक नवीन वळण आलं.
१६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
पोलिसांना रतलाममधून काही दागिने सापडले असले तरी, बहुतेक दागिने अजूनही गायब आहेत. विपिन रघुवंशी यांनी राजा आणि सोनम यांना त्यांच्या लग्नात भेट दिलेल्या सर्व दागिन्यांचे फोटो इंदूर गुन्हे शाखेत उपस्थित असलेल्या मेघालय पोलीस पथकाला दिले आहेत. लग्नाच्या वेळी राजाने जे दागिने घातले होते, ते त्याने सोनमच्या आग्रहावरून हनिमून ट्रिप दरम्यान देखील घातले होते. आता हेच दागिने हत्येनंतर गायब आहेत, ज्याचा पोलीस शोध घेत आहेत.