"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 09:07 IST2025-10-13T09:07:39+5:302025-10-13T09:07:52+5:30
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे झालेल्या घटनेने देशाला हादरवून टाकलं आहे.

"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने देशाला हादरवून टाकलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी कॉलेज कॅम्पसबाहेर ओडिशातील एका विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी कारवाई सुरू केली. आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन फरार आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्ल्यू) सदस्या अर्चना मजुमदार यांनी पीडितेच्या मित्राची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा केला आहे. रुग्णालयात पीडितेची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की विद्यार्थिनीला कॉलेजच्या बाहेर येण्यास तिच्या मित्राने सांगितलं . मुलीच्या मित्राचीही आता चौकशी सुरू आहे. तिने त्य़ाच्यासोबत बाहेर यावं हा त्याचाच हट्ट होता.
आरोपींनी कॉलेज कॅम्पसबाहेर पीडितेला घेरताच तिचा मित्र तिथून निघून गेला. पोलिसांनी या दृष्टिकोनातून सखोल चौकशी करावी, कारण सुरुवातीच्या पुराव्यांवरून असं दिसून येतं की त्या मित्राने या घटनेत महत्त्वाची भूमिका बजावली असावी. ओडिशाहून दुर्गापूरला आलेल्या पीडितेच्या वडिलांनीही त्यांच्या मुलीच्या मित्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
"आरोपींनी माझ्या मुलीला घेरताच तिचा मित्र तिथून पळून गेला. माझ्या मुलीला सध्या प्रचंड वेदना होत आहेत. तिला चालताही येत नाही. ती हॉस्पिटलच्या बेडवर आहे. आम्हाला तिच्या सुरक्षिततेची खूप काळजी आहे. आम्हाला भीती आहे की ते तिला कधीही तिथे मारू शकतात. म्हणूनच आम्हाला तिला ओडिशाला परत घेऊन जायचं आहे. आमचा आता बंगालवरचा विश्वास उडाला आहे. ती ओडिशामध्ये शिक्षण घेऊ शकते" असं वडिलांनी म्हटलं आहे.
रविवारी दुर्गापूर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. कागदपत्रं, नमुने आणि महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले. पुरावे जमा करण्यासाठी संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच दरम्यान ओडिशा सरकारची टीमही दुर्गापूरमध्ये पोहोचली आणि पीडितेला भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना परवानगी नाकारण्यात आली.