पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:01 IST2025-10-11T18:01:20+5:302025-10-11T18:01:29+5:30
West Bengal MBBS Student Rape case: मैत्रिणीसोबत जेवायला गेलेल्या पीडितेला ओढत निर्जण ठिकाणी आणलं अन्...

पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
West Bengal Crime: पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारख्या अत्याचाराच्या घटनेने हादरुन गेले आहे. दुर्गापूरमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर कॉलेज हॉस्पिटल परिसरातच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने गेल्या वर्षी राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज बलात्कार आणि खून प्रकरणाची आठवण ताजी झाली.
सविस्तर माहिती अशी की, ओडिशातील रहिवासी असलेली पीडिता तरुणी दुर्गापूरच्या शोभापुर परिसरात असलेल्या खासगी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेते. शुक्रवारी रात्री सुमारे ८:३० वाजता ती आपल्या वर्गमैत्रिणींसह जेवायला बाहेर गेली होती. परत येताना 2 ते 3 तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यापैकी एकाने विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून घेतला, तर दुसऱ्याने तिला निर्गण ठिकाणी ओढत नेऊन बलात्कार केला.
यानंतर मैत्रिणींने पीडित विद्यार्थिनीला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला असून, सामूहिक बलात्काराच्या अँगलने तपास करत आहेत. तिच्या मैत्रिणींची भूमिकाही तपासली जात आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाची तत्परता
या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतः हस्तक्षेप केला आहे. आयोगाच्या सदस्या अर्चना मजूमदार यांनी सांगितले की, आयोग 11 ऑक्टोबर रोजी दुर्गापूर मेडिकल कॉलेजच्या घटनेच्या ठिकाणी भेट देईल. त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, “गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळत नाही, त्यामुळे राज्यात अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.”
आरोग्य शिक्षण विभागाची कारवाई
राज्याच्या आरोग्य शिक्षण संचालक इंद्रजीत साहा यांनी संबंधित खासगी मेडिकल कॉलेजकडून तातडीचा अहवाल मागवला आहे. आरोग्य भवनच्या सूत्रांनुसार, पोलिस तपासावर आरोग्य विभागही बारीक लक्ष ठेवत आहे. या घटनेनंतर कॉलेज परिसरात तीव्र रोषाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांनी मौन मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आणि महाविद्यालय प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली.