शाब्बास पोलिसांनो! दरोड्याचा कट उधळत चौघांना केली अटक; घातक शस्त्रे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 14:51 IST2021-05-27T14:50:50+5:302021-05-27T14:51:31+5:30
Dacoity Plan Busted :पोलिसांच्या हाती लागलेले आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध चोरी, घरफोडी, लूटमार तसेच हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.

शाब्बास पोलिसांनो! दरोड्याचा कट उधळत चौघांना केली अटक; घातक शस्त्रे जप्त
नागपूर : ज्वेलर्स लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार सशस्त्र गुंडांना यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. शेख सुलतान शेख मोहम्मद (वय २४, रा. संघर्ष नगर ), शेख वजीर शेख याकूब (वय २३, रा. संघर्ष नगर), शुभम उर्फ चुक्का छोटेलाल बिरहा (वय २६, रा. संतोषनगर) आणि दशरथ उर्फ गुस नरोत्तम शाहू (वय २३,रा. गरीब नवाज नगर) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.
यशोधरानगर पोलिसांचे पथक बुधवारी मध्यरात्री संत नामदेव नगरात गस्त करीत असताना नाल्याजवळ त्यांना काही आरोपी संशयास्पद अवस्थेत दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेऊन उपरोक्त चौघांना पकडले. त्यांच्याकडून एक छऱ्याची बंदूक, तीन तलवारी, मिरची पावडर आणि नायलॉन दोरी जप्त करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता उपरोक्त आरोपी या परिसरातील एक ज्वेलर्सचे दुकान तसेच एटीएम फोडण्याच्या तयारीत होते, अशी माहिती आरोपींनी दिली. आरोपीचे दोन साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार
पोलिसांच्या हाती लागलेले आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध चोरी, घरफोडी, लूटमार तसेच हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.