लग्न, व्हॅलेंटाईनचा रोमान्स अन् सातव्या दिवशी केला गेम; नवविवाहितेने पतीला 'असा' लावला चुना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:13 IST2026-02-19T13:11:37+5:302026-02-19T13:13:54+5:30
लग्नाला अवघे सात दिवस उलटत नाही तोच, एक नवविवाहिता पतीला चकवा देऊन आपल्या अल्पवयीन प्रियकरासोबत दागिने आणि रोकड घेऊन पसार झाली आहे.

AI Generated Image
लग्नाचे विधी पार पडले, अक्षता पडल्या आणि सुखी संसाराची स्वप्ने रंगवली गेली. अगदी ७व्या दिवशी नवऱ्यासोबत 'व्हॅलेंटाईन डे'चा आनंदही साजरा केला. मात्र, या प्रेमाच्या नाटकामागे काहीतरी वेगळंच शिजत होतं. लग्नाला अवघे सात दिवस उलटत नाही तोच, औरैयामधील एक नवविवाहिता पतीला चकवा देऊन आपल्या अल्पवयीन प्रियकरासोबत दागिने आणि रोकड घेऊन पसार झाली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
माहेरून झाली गायब; दागिन्यांवरही साफ केला हात
अजीतमल कोतवाली क्षेत्रातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. १० फेब्रुवारी २०२६ रोजी या तरुणीचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. १७ फेब्रुवारीपर्यंत ती पतीसोबत सासरीच होती. पतीच्या सांगण्यानुसार, दोघांनी मिळून व्हॅलेंटाईन डे देखील उत्साहात साजरा केला. १७ फेब्रुवारीला ती माहेरी गेली आणि त्याच रात्री ती संशयास्पद रित्या बेपत्ता झाली. जाताना तिने सासरून मिळालेले अडीचशे ग्रॅम चांदीचे पैंजण, सोन्याची चेन, मंगळसूत्र, अंगठ्या, कंबरपट्टा असा लाखो रुपयांचा ऐवज आणि २० हजार रुपयांची रोकड सोबत नेल्याचा आरोप पतीने केला आहे.
अल्पवयीन मुलासोबत प्रेमप्रकरण?
या कथेतील ट्विस्ट तेव्हा समोर आला जेव्हा गावातीलच एका वृद्ध महिलेने आपला अल्पवयीन नातू बेपत्ता असल्याची तक्रार पोलीसात दिली. तो मुलगा मंगळवारी संध्याकाळी दुचाकी घेऊन घरातून निघाला होता, तो अद्याप परतला नाही. पीडित पतीच्या दाव्यानुसार, पत्नीचे लग्नापूर्वीपासूनच या मुलाशी संबंध होते आणि याची माहिती तिच्या घरच्यांनाही होती. आता ही विवाहिता त्याच अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडून शोध सुरू
या प्रकरणी पती आणि तरुणीच्या वडिलांनी स्वतंत्र तक्रारी दिल्या आहेत. मुलीच्या वडिलांनीही गावातीलच एका तरुणाने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची शंका व्यक्त केली आहे. पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला असून, बेपत्ता विवाहिता आणि तो अल्पवयीन मुलगा यांचा शोध घेतला जात आहे. "आम्ही सर्व तक्रारींची दखल घेतली असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा करू," असे आश्वासन कोतवाली प्रभारींनी दिले आहे.