वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:40 IST2025-05-07T17:39:30+5:302025-05-07T17:40:31+5:30
Wardha crime news: दोघेही विवाहित होते. मात्र, त्यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही १ मेपासून घरातून बेपत्ता होते. याबाबत दोघांच्याही कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दिली होती.

वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
वर्धा जिल्ह्यातील केळझर परिसरातील किन्हाळा साजातील दहेगाव (गोसावी) रोडच्या बाजूला असलेल्या एका शेतातील विहिरीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मृत महिलेचे नाव सुमन सतीश लडके (३३, रा.जाम, ता. हिंगणघाट), तर मृत पुरुषाचे नाव मोहन गोपाल वैद्य (४१, रा. टाकळघाट, ता. हिंगणा, जि. नागपूर) अशी आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोघेही विवाहित होते. मात्र, त्यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. सुमन सतीश लडके आणि मोहन गोपाल वैद्य हे दोघेही १ मेपासून घरातून बेपत्ता होते. याबाबत दोघांच्याही कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दिली होती. सेलूचे ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक जावेद धामिया यांच्यासह पोलिस पथकाने पंचनामा करून, दोन्ही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.
विहिरीजवळ होत्या चपला, मोबाईल व पाकीट
सोमवारी सकाळी दहेगाव मार्गावरील नागपूर येथील खालीद गयासुद्दीन कुरेशी यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीजवळ चपला, बॅग, मोबाइल, पैशाचे पाकीट असल्याचे काही जणांना दिसले. त्यांनी विहिरीत पाहिले असता, महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी लगेच घटनेची माहिती पोलिस पाटील प्रकाश खंडाळे यांना दिली. त्यांनी सेलू पोलिसांना माहिती दिली.
विहिरीतील पाणी उपसल्यानंतर आढळला पुरुषाचा मृतदेह
प्रथम महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मात्र, विहिरीत भरपूर पाणी असल्याने, तसेच पुरुषाचा मृतदेह विहिरीच्या तळाला असल्याने दिसत नव्हता. त्यामुळे उशिरापर्यंत विद्युत मोटारपंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. नंतर पुरुषाचा मृतदेह आढळला.
दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढण्याकरिता केळझर येथील लखनसिंग बावरी यांनी, तर मृत महिलेचा पंचनामा करण्याकरिता येथील हमिदा शेख यांनी पोलिसांना सहकार्य केले.
दोघेही विवाहित, कुटुंबीयांनी फोडला हंबरडा
पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. यावेळी दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता.
मृत महिला सुमन सतीश लडके यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी, तर मृत मोहन गोपाल वैद्य यांच्यापश्चात पत्नी, दोन मुली व मोठा आप्तपरिवार आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. या प्रकरणी पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.