विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी सहायक आयुक्तांवर गुन्हा; निष्काळजीपणाचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:08 IST2025-11-06T10:07:14+5:302025-11-06T10:08:09+5:30
इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी

विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी सहायक आयुक्तांवर गुन्हा; निष्काळजीपणाचा ठपका
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : अनधिकृत इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची दुर्घटना दोन महिन्यांपूर्वी घडली आहे. या इमारत दुर्घटना प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गुन्हे शाखा युनिट तीनने या घटनेच्या तपासात मनपाचे प्रभाग समिती (सी)चे सहायक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.
विरारच्या विजयनगर परिसरात असलेली रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत २६ ऑगस्ट २०२५ रोजी कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता तर ९ जण जखमी झाले होते. ही चार मजली अनधिकृत इमारत होती. यात ५० सदनिका होत्या. मात्र, अवघ्या काही वर्षांतच ही इमारत जीर्ण आणि धोकादायक बनली होती. विकासकाने रहिवाशांची दिशाभूल करून इमारत अधिकृत असल्याचे भासवले होते. त्यामुळे रहिवासी कर भरत होते. या दुर्घनटेनंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नितल साने आणि जागा मालकासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
...तर १७ जणांचा जीव वाचला असता
पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनकडे सोपवला आहे. विकासक नितल साने (४८) अद्याप तुरुंगात आहे. गुन्हे शाखेच्या तपासामध्ये असे दिसून आले की, सहायक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांनी इमारतीला नोटीस पाठवली. परंतु, इमारत वेळेत रिकामी केली असती तर १७ जण वाचले असते.
चार हजार पानांचे आरोपपत्र
गुन्हे शाखा युनिट तीनने या संपूर्ण प्रकरणात पुरावे आणि जबाबांच्या आधारावर चार हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणात मनपाच्या इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू असून, त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल, असे गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलिस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले आहे.