उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे विवाहित महिला निक्कीची जिवंत जाळून हत्या करण्यात आली. या हत्येचा आरोप पतीसह सासरच्यांवर लावला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली. निक्कीचे कुटुंब पती विपिनसह सासरच्यांना फासावर लटकवा असा आक्रोश करत आहेत. या खटल्याची सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरू आहे. आता या हत्याकांडात एका मिस्ट्री गर्लची एन्ट्री झाली आहे. तपासात विपिन रात्रभर घराबाहेर असायचा, डिस्कोला जायचा आणि दिवसभर निक्कीशी घरात वाद घालायचा हे समोर आले आहे.
रिपोर्टनुसार, विपिनचे एका मुलीसोबत प्रेम संबंध सुरू होते. विपिनचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात काही लोक त्याला मारहाण करताना दिसतात. व्हिडिओत कारमध्ये एक मुलगीही बसली होती. हा व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे जेव्हा निक्कीने विपिनला एका मुलीसोबत रंगेहाथ पकडले होते. या व्हिडिओवर निक्कीच्या काकांनीही भाष्य केले. विपिनला एका मुलीसोबत पकडले होते, त्यातून मोठा वाद झाला. निक्की आणि विपिन यांच्यात भांडणही झाले होते परंतु समाजात बदनामीच्या भीतीने विपिनने निक्कीशी माफी मागितली आणि प्रकरण शांत झाले. मागील वर्षीचा हा व्हिडिओ तेव्हाही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
रात्रभर घराच्या बाहेर राहायचा विपिन
निक्कीची बहीण कांचन हिने विपिनचे अनेक मुलींसोबत संबंध होते असा आरोप केला. तो रात्रभर घराच्या बाहेर राहायचा. जेव्हा निक्की त्याला जाब विचारायची तेव्हा तो तिला मारहाण करत होता असं कांचनने म्हटलं. तर विपिन रात्री डिस्कोला जायचा, तो काही काम करायचा नाही. इतकेच काय तर निक्कीला घर खर्च करण्यासाठी पैसे द्यायचे बंद केले होते असं शेजाऱ्यांनी म्हटलं.
दरम्यान, निक्कीच्या कुटुंबाने दीड वर्षापूर्वी निक्की आणि कांचन यांच्या पार्लरसाठी ८ लाख रूपये दिले होते. विपिन आणि त्याचा भाऊ काही काम करत नव्हते. दोन्ही बहिणी पार्लर चालवून स्वत:चा आणि त्यांच्या मुलांचा खर्च उचलत होत्या. अलीकडेच विपिनने पत्नी निक्कीच्या पार्लरमधून पैसेही चोरी करण्यास सुरुवात केली होती असा आरोप निक्कीच्या वडिलांनी केला आहे.