Video : वाहतूक पोलिसाला मुजोर बापा-लेकाने केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 14:18 IST2019-04-13T14:15:48+5:302019-04-13T14:18:31+5:30
गावदेवी पोलिसांनी बाप - लेकाला ठोकल्या बेड्या

Video : वाहतूक पोलिसाला मुजोर बापा-लेकाने केली मारहाण
मुंबई - ताडदेव परिसरात ताडदेव वाहतूक चौकीचे पोलीस नाईक सानप हे कर्तव्यावर होते. त्यावेळी नो इंट्रीमध्ये येणाऱ्या वाहनाला रोखल्याने वाहनातील बाप-लेकाने संप यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी मुजोर बापलेकाला अटक केली आहे. ही घटना काल रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या सर्व मारहाणीचा प्रकार सोशल मीडियावर वायरल झाल्याने समोर आला.
अलीकडेच जुहू गल्लीतील अवैध फेरीवाल्यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह इतर पोलिसांवर हात उगारल्याची घटना घडली होती.त्याआधी विलास शिंदे यांना देखील बेदरकारपणे बाईक चालविणाऱ्या अल्पवयीन दुचाकीस्वाराने मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यातच काल ताडदेव येथे पोलीस नाईक सानप यांना कर्तव्यावर असताना बाप - लेकाने मारहाण केली. सानप हे नो एन्ट्रीमध्ये येणाऱ्या वाहन क्रमांक एमएच०१; बीवाय १६२९ या वाहनांवर कारवाई करत असताना वाहन चालक जशन मुनवानी आणि त्याचे वडील जय मुनवानी यांच्यासह त्यांचे इतर दोन साथीदारांनी सानप यांना मारहाण केली आणि शासकीय कामात अडथळा आणला. यावेळी सानप यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. दरम्यान सानप यांच्या हातातील डायरी आणि मोबाईल जमिनीवर पडले. याबाबतचा व्हिडीओ वायरल झाला. बापलेकासह दोघांना गावदेवी पोलिसांनी भा. दं. वि. कलम 353, 332, 504, 506, 34 मोटार वाहन कायदा कलम 122, 17(1)/177, 179 अन्वये नोंद करण्यात आला असून वर चार आरोपींपैकी जशन मुनवानी आणि जय मुनवानी यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने अटक दोन आरोपींना १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.