Army Jawan Beaten at Toll Plaza: टोलनाक्यावरील कर्मचारी आहेत की, गुंड, असा प्रश्न तुम्हालाही हा व्हिडीओ बघून पडेल. एका जवानावर भटके कुत्री तुटून पडावी तसे हे टोलनाक्यावरील कर्मचारी दिसत आहे. आधी जवानाला लाथा बुक्क्यांनी मारलं. त्यानंतर त्याला खांबाला बांधून दांडक्यांनी मारहाण केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. कपिल असे मारहाण करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे.
मेरठमधील सरुरपूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या भुनी टोलनाक्यावर हा प्रकार घडला. कावड यात्रेनिमित्ताने सुट्टीवर आला होता. सुट्ट्या संपल्यामुळे तो परत श्रीनगरला निघाला होता. त्याचवेळी टोलनाक्यावर ही घटना घडली.
जवानाला बेदम मारहाण, व्हिडीओ बघा
टोल कर्मचाऱ्यांनी जवानाला मारहाण का केली?
मिळालेल्या माहितीनुसार, टोलनाक्यावर वाहनांची रांग होती आणि लवकर जाऊ द्या म्हणून कपिल टोल कर्मचाऱ्यांना बोलायला गेला होता. पण, लवकर जाऊ देण्यावरून बोलणं सुरू असतानाच शाब्दिक चकमक झाली आणि वाद विकोपाला गेला.
त्यानंतर जवानावर टोलनाक्यावरील सर्वच कर्मचारी तुटून पडले. त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारले. त्यानंतर एका खांबाजवळ नेऊन एकाने त्याचे हात पाठीमागे धरून ठेवले आणि इतरांनी त्याला लाथा मारण्यास सुरूवात केली. एकाने दांडक्याने मारहाण केली.
त्याला मारहाण करून नका म्हणून काहीजण त्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना विनवण्या करू लागले. त्यांनाही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.
मेरठचे पोलीस अधीक्षक राकेश कुमार यांनी सांगितले की, याप्रकरणी जवान कपिल याच्या कुटुंबीयांनी सरूरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी लगेच कारवाई केली. सीसीटीव्हीच्या आधारावर चार मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.