"आवाज केला तर अजून लोकांना बोलवू"; काळजावर दगड ठेवून पीडितेने सांगितली अत्याचाराची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:52 IST2025-10-14T17:48:26+5:302025-10-14T17:52:59+5:30
पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.

"आवाज केला तर अजून लोकांना बोलवू"; काळजावर दगड ठेवून पीडितेने सांगितली अत्याचाराची कहाणी
Durgapur Rape Case:पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. जेवणासाठी बाहेर गेलेल्या विद्यार्थिनीवर नराधमांनी अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. दुसरीकडे, सामूहिक बलात्कार झालेल्या तरुणीने त्या दिवशी नेमके काय घडलं हे सांगितले आहे. तिने तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सांगितले की, त्या रात्री जेवण करून परत येत असताना, तिला काही पुरूषांनी जंगलात ओढत नेले होते. या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये वातावरण तापलं असून सरकारवर जोरदार टीका केली जातेय.
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या जबाबाने देशभरात खळबळ उडाली आहे. ही घटना १० ऑक्टोबरच्या रात्री घडली, जेव्हा दुसऱ्या वर्षाच्या वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसोबत जेवण करून परतत होती. वाटेत काही लोकांनी तिला घेरले आणि तिला जंगलात नेऊन अत्याचार केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर बोलताना ती इतक्या रात्री बाहेर काय करत होती असं विचारल्यानंतर हे प्रकरण अधिकच चर्चेत आले.
"आम्ही तीन जणांना त्यांची गाडी सोडून आमच्याकडे येताना पाहिले. घाबरून आम्ही जंगलात पळत गेलो. ते माझ्या मागे धावत आले. त्यांनी मला पकडले आणि जंगलात ओढले. मग त्यांनी माझा फोन घेतला आणि माझ्या मैत्रिणीला बोलवायला सांगितले. माझी मैत्रीण आली नाही म्हणून त्यांनी मला जंगलात नेले आणि झोपवले. एका माणसाने माझी पँट उघडली आणि माझ्यासोबत चुकीच्या गोष्टी करु लागला. मी ओरडू लागलो तेव्हा त्यांनी धमकी दिली की जर मी जास्त आवाज केला तर आणखी लोक येतील आणि असेच करतील," असे पीडितेने सांगितले.
घटनेची माहिती समोर आल्यानंतर जनतेचा रोष वाढला. बंगाल पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बलात्कार प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये मेडिकल कॉलेजमधील माजी सुरक्षा रक्षक, रुग्णालयातील कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी आणि एका बेरोजगार तरुणाचा समावेश आहे. एका आरोपीच्या बहिणीनेही त्याला पकडण्यात पोलिसांना मदत केली.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी रात्री १२:३० वाजता विद्यार्थिनी कशी बाहेर पडली असा प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय वादाला तोंड फुटले. भाजपने त्यांच्या या विधानावर टीका केली. विद्यार्थिनीच्या पालकांनीही कॉलेजवर निष्काळजीपणाचा आरोप केला. विद्यार्थिनीच्या वडिलांनी कॅम्पसमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप केला.