पिंपळे निलख येथे धुडगूस घालत टोळक्याने केली वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:46 IST2020-06-15T13:44:42+5:302020-06-15T13:46:00+5:30

तलवार व कोयत्याचा धाक दाखूवन चौघांना मारहाण; सात वाहनांची तोडफोड

Vehicles were breaking by a mob; incident in the pimple nilakh | पिंपळे निलख येथे धुडगूस घालत टोळक्याने केली वाहनांची तोडफोड

पिंपळे निलख येथे धुडगूस घालत टोळक्याने केली वाहनांची तोडफोड

पिंपरी : उद्योगनगरीत वाहनतोडफोडीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये दहशत आहे. पूर्ववैमन्यस्यातून टोळक्याने हल्ला करून तलवार व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच सात वाहनांची तोडफोड केली. पिंपळे निलख येथे रविवारी (दि. १४) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

चेतन आहिरे (रा. पिपळे निलख), समीर शेख (रा. कस्तुरबा गांधी झोपडपट्टी, औंध) आणि त्याचे बारा अनोळखी साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजकुमार आरसन पिल्ले (वय २५, रा. शारदा कॉलनी, पिपळे निलख) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी राजकुमार पिल्ले, संतोष सिध्देश्वर चौधरी (वय २१), चेतन गणेश जवरे (वय २०) आणि अजय भरत कांबळे (वय २४, सर्व रा. पिंपळे निलख) हे चौघे यात जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र घरी जात होते. त्यावेळी आरोपी चेतन अहिरे, समीर शेख व इतर बारा जण हातात कोयते व तलवारी घेऊन दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी पिल्ले यांच्यावर वार केले. पिल्ले यांचे मित्र भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपी यांनी त्यांना तलवारी व कोयत्याचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले. तसेच फिर्यादी यांच्या घरमालकाच्या चारचाकी वाहनासह इतर सात वाहनांची तोडफोड केली. शारदा कॉलनी परिसरातील सात वाहनांची आरोपी यांनी तोडफोड केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Vehicles were breaking by a mob; incident in the pimple nilakh