अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 00:15 IST2025-09-08T00:14:35+5:302025-09-08T00:15:06+5:30
Vanraj Andekar, Ayush Komkar Murder Revenge Case:गोळीबारानंतर आरोपींनी दहशत माजवली. घटनास्थळावर १२ काडतुसे आणि मृतदेहात नऊ गोळ्या आढळल्या आहेत.

अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे
नाना पेठेतील आयुष कोमकर (वय १८) खून प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल केला आहे. सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून यापैकी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६०), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४१), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय २३), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९)
अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत..
शुक्रवारी (५ ऑक्टोबर) संध्याकाळी नाना पेठेत झालेल्या गोळीबारात आयुष कोमकर (वय १८) याचा मृत्यू झाला. आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. या खुनानंतर पुन्हा आंदेकर-कोमकर टोळ्यांमधील वैर उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
फिर्यादीनुसार आरोपींनी वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पूर्वनियोजित कट रचला. अमन पठाण आणि यश पाटील यांनी गोळीबार केला, तर अमित पाटोळे आणि सुजल मेरगू घटनास्थळी उपस्थित होते. गोळीबारानंतर आरोपींनी दहशत माजवली. घटनास्थळावर १२ काडतुसे आणि मृतदेहात नऊ गोळ्या आढळल्या आहेत.
सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी आरोपींना सात दिवसांची कोठडी द्यावी, असा युक्तिवाद केला. तर बचाव पक्षाने अटक आरोपींचा या गुन्ह्याशी संबंध नसल्याचा दावा केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांनी आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.