दहशतवादी कारवायांकरिता वैभव सोशल मीडियापासून राहिला दूर
By पूनम अपराज | Updated: August 10, 2018 21:04 IST2018-08-10T21:03:42+5:302018-08-10T21:04:16+5:30
वैभवविरोधात २०१४ मध्ये दाखल झाला होता गुन्हा

दहशतवादी कारवायांकरिता वैभव सोशल मीडियापासून राहिला दूर
मुंबई - वैभव राऊत जरी बाहेर सर्वसामान्य वागत असला तरी त्याने सोयीस्कररित्या फेसबुक आणि ट्विटर खाते वापरणे बंद केले होते. त्याने गेल्या दोन वर्षापासूनच फेसबुकपासून दूर राहण्याचे ठरविले होती. विशेष म्हणजे फेसबुकच्या सर्व संदेश (पोस्ट) त्याने नष्ट केल्या होत्या. ट्विटररही मागील वर्षी शेवटचे ट्विट केले होते. यामुळे पडद्यामागे त्याच्या संवेदनशील हालचाली सुरू होत्या. मात्र, त्याची जराही कल्पना त्याचे मित्र आणि कुटुंबियांना नव्हती. फेसबुकवर केवळ त्याचे १२ मित्र दिसत असून एकही पोस्ट दिसत नाही.
शहरात होणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखाने, गाईंची चोरून होणारी वाहतूक याबाद्दल तो सातत्याने पोलिसांना तक्रारी करत असे. यामुळेच त्याच्या विरोधात २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. भांडार आळी आणि लगत असलेला मुस्लिम वसाहतीचा परिसर यामुळे हा भाग नेहमी संवेदनशील मानला जातो. त्यामुळे ईदसारख्या सणांच्या वेळी वैभववर पोलीस प्रतिबंधात्मक नोटिसा बजावत असत. त्याला एटीएसने गोवले आल्याचे त्याचे सहकारी आणि मित्र छातीठोकपणे सांगत आहेत. आम्ही त्याच्याबरोबर गोरक्षणाचे धर्माचे कार्य करतो. मात्र, अशा विघातक कृत्यात कसा गेला याबद्दल सर्वांनाच धक्का बसला आहे.