पौंडी - उत्तराखंडच्या पौंडी येथे तलसारी गावात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. याठिकाणी ३२ वर्षीय युवकाने कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. त्यात मृत युवक जितेंद्र सिंह याने मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून युवकाने भाजपा युवा मोर्चाचा प्रदेश मंत्री हिमांशु चमोली याला मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.
या व्हिडिओत जितेंद्रने आरोप केलाय की, हिमांशुने जमीन व्यवहाराच्या नावाखाली माझ्याकडून ३५ लाख घेतले परंतु ना काम पूर्ण झाले, ना त्याने माझे पैसे परत केले. हिमांशुने स्वत:ला मुख्यमंत्र्यांचा ओएसडी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर अनेकांकडून याच बहाण्याने पैसे घेतले. त्याने माझे आयुष्य बर्बाद केले, मी मर्सिडिज, २-२ लाखांचे महागडे फोन आणि रोकड दिली. त्याला ऑफिस उघडण्यासाठी मदत केली. केदारनाथ यात्रेसाठी त्याच्यावर ७ लाख खर्च केले परंतु माझी मोठी फसवणूक झाली असं त्याने व्हिडिओत म्हटलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच पौंडीचे एसएसपी लोकेश्वर सिंह यांच्या निर्देशाने पोलीस घटनास्थळी पोहचली. फॉरेन्सिक तपास सुरू केला. मृत्यूपूर्वी युवकाने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुरावा म्हणून सुरक्षित ठेवला आहे. आरोपी हिमांशु चमोलीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेची दखल घेत हिमांशु चमोली ओएसडी असल्याचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे असं सांगितले आहे. हिमांशु नावाचा कुणीही मुख्यमंत्री कार्यालयात नाही. भाजपानेही हे प्रकरण समोर येताच हिमांशुची पदावरून हकालपट्टी करत पक्षातून काढले आहे.
काय आहे प्रकरण?
जितेंद्र देहारादून येथे प्रॉपर्टी व्यवसाय करतो. त्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड केला. त्यात भाजपा युवा मोर्चाचा हिमांशु चमोली यांच्यासह ५ जणांवर आरोप केला. पहाटे साडे चारच्या सुमारास ही घटना घडली. जितेंद्रच्या मित्राने त्याच्या वडिलांना फोन करून जितेंद्रने गोळी मारल्याचे सांगितले. माझ्या मुलाला काही जण त्रास देत होते, त्याच्याकडून पैसे घेतले परंतु काम केले नाही. त्यातून तो त्रस्त झाला होता. नैराश्येतून अखेर त्याने स्वत:ला संपवलं असं त्याचे वडील सतीश चंद्र यांनी आरोप केला.