उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील दुबग्गा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'अंधे की चौकी' येथील एका कार विक्रेत्याच्या दुकानात दोन तरुण एसयूव्ही खरेदीच्या बहाण्याने आले होते. त्यांना तेथे उभी असलेली एक फॉर्च्युनर कार आवडली. यानंतर, हे दोघेही एका कर्मचाऱ्यासोबत फॉर्च्यूनर घेऊन टेस्ट ड्राईव्हच्या बहान्याने निघाले. यानंतर, हरदोई रोडवरील कासमंडीजवळ पोहोचताच, त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करत चालत्या कारमधून बाहेर फेकले आणि ते फॉर्च्युनर घेऊन पळून गेले. पीडित व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कारवाई करत दुबग्गा पोलिसांनी रात्री उशिरा फॉर्च्युनर जप्त केली आणि एका आरोपीला ताब्यात घेतले. मात्र पोलिसांनी लुटीऐवजी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठाकूरगंजमधील बालागंज भागातील रहिवासी मोहम्मद अलीम यांचा, जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ते अंधे की चौकीमध्ये पॉवर कार सेल नावाचे दुकान चालवतात. अलीम यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सहा महिन्यांपूर्वी एक फॉर्च्यूनर विक्रीसाठी घेतली होती. बुधवारी दुपारी दोन तरुण त्यांच्या दुकानात आले. त्यांनी, आपल्याला एसयूव्ही खरेदी करायची असल्याचे सांगिते. यावर आपल्याला फॉर्च्युनर आवडल्याचे सांगत टेस्ट ड्राइव्हची मागणी केली. यानंतर, त्याने त्यांचा कर्मचारी यासीनला टेस्ट ड्राइव्हसाठी पाठवले. हरदोई रोडवरील कासमंडीजवळ पोहोचताच दोन्ही आरोपींनी यासीनला मारहाण करत कारमधून बाहेर फेकले. यानंतर, त्याने अलीम यांना माहिती दिली. यावर अलीम हे दुबग्गा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि तक्रार दाखल केली.
बाजनगर अंडरपासजवळून फॉर्च्युनर जप्त -दुबग्गा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिनव वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने किसान पथवरील बाजनगर अंडरपासजवळून फॉर्च्युनर जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी, काकोरीतील कलियाखेडा येथील रहिवासी असलेल्या आरोपी अमनला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. तसेच दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.