नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:56 IST2025-11-02T13:56:10+5:302025-11-02T13:56:41+5:30
Uttar Pradesh Crime: दैनंदिन वाद आणि अविश्वासाने घेतला महिलेचा बळी!

नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील नवाबगंज परिसरात घडलेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण प्रदेशाला हादरवून सोडले आहे. एका महिलेची तिच्याच पतीने, दीराच्या मदतीने गळा चिरुन निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात आता पती आणि दीरासह सासू-सासऱ्यांना अटक केली आहे.
खूनानंतर घरात कुलूप आरोपी फरार
ही घटना ओम सिटी कॉलनीत मागील मंगळवारी सकाळी घडली होती. हत्येनंतर आरोपी घराला कुलूप लावून फरार झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी पती अनिल, दीर सचिन, सासू भगवानदेवी, सासरा जमुना प्रसाद आणि चुलतेसासरे महेश यांना आज(रविवार) अटक केली. अनिल आणि सचिनवर खुनाचा गुन्हा, तर उर्वरित तिघांवर हुंडाबळी व अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमविवाह, पण घरच्यांनी लग्न स्वीकारले नाही
अनीता आणि अनिल यांचे नाते काही वर्षांपूर्वी जुळले होते. अनीता ही अनिलच्या आत्येभावाची मेव्हुणी होती. दोघांमध्ये प्रेम झाले आणि घरच्यांच्या विरोधात त्यांनी लग्न केले. घरच्यांनी जबरदस्तीने हे नाते मान्य केले, पण मनोमन कधीही ते स्वीकारले नाही. लग्नानंतर अनीता काही काळ कमुआ गावात सासरी राहिली, परंतु तिथल्या परंपरा आणि सासू-सासऱ्यांचा कठोर स्वभाव तिला रुचला नाही. ती शहरात राहण्याचा हट्ट करू लागली. अनिलने तिची इच्छा मान्य करून बरेलीतील ओम सिटी कॉलनीत घर भाड्याने घेतले आणि लहान भाऊ सचिनसोबत राहू लागला.
रोजचे वाद आणि अविश्वास
शहरात राहू लागल्यावर दोघांमध्ये आर्थिक ताण वाढला. अनिलचा व्यवसाय मंदावला, भागीदार कमी झाले आणि खर्चही वाढला. या तणावामुळे पती-पत्नीचे संबंध आणखी ताणले गेले. अनिलने पोलिसांना चौकशीत सांगितले की, अनीता त्याच्यावर नेहमी शंका घेत असे. तो बाहेर गेला की, फोनवरुन भांडण सुरू होई. तर अनीताला त्याच्या जुन्या प्रेमसंबंधांचा राग होता. परिणामी घरात दररोज वाद व्हायचा.
वादातून खूनाचा निर्णय
मंगळवारी सकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. अनीताने काही कटू शब्द उच्चारल्यावर अनिलचा संताप फुटला. त्याने भावाला बोलावले. सचिनने अनीताच्या छातीवर बसून तिचे हात धरून ठेवले, तर अनिलने कोयत्याने गळा चिरुन तिची हत्या केली. यानंतर दोघांनी घराला कुलूप लावून पोबारा केला. संध्याकाळी शेजाऱ्यांना संशय आला, त्यांनी पोलिसांना बोलावले. दरवाजा तोडल्यावर घरात रक्ताने माखलेला अनीताचा मृतदेह आणि बाजूला हत्येसाठी वापरलेले हत्यार आढळले. अखेर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.