पाकिस्तानी तरुणीशी फोनवर गप्पा... लष्कराची माहिती दिली आयएसआयला, एकाला अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:31 IST2023-09-26T16:28:47+5:302023-09-26T16:31:40+5:30
लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून शेअर केली.

पाकिस्तानी तरुणीशी फोनवर गप्पा... लष्कराची माहिती दिली आयएसआयला, एकाला अटक!
उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने भारतीय लष्कराची हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील कासगंज येथील पटियाली येथून ही अटक करण्यात आली आहे. शैलेश कुमार उर्फ शैलेंद्र सिंह चौहान असे आरोपीचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शैलेशने लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून शेअर केली. याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेशने जवळपास नऊ महिने अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्करात अस्थायी मजूर म्हणून काम केले होते. यावेळी त्याने भारतीय लष्कराशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती गोळा केली. शैलेश सध्या भारतीय लष्करात कोणत्याही पदावर कार्यरत नाही. मात्र, जेव्हा त्याला कोणीही त्याच्या नोकरीबद्दल विचारत होते, तेव्हा तो आपण भारतीय सैन्यात काम करत असल्याचे सांगत होता.
ISI हँडलरच्या संपर्कात
शैलेशने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शैलेश चौहान नावाने एक प्रोफाईल तयार केले होते. ज्याच्या प्रोफाईल फोटोमध्ये त्याने भारतीय सैन्याच्या गणवेशातील फोटो टाकला होता. यातून शैलेश हा प्रीती नावाच्या आयएसआय हँडलरच्या संपर्कात होता. याशिवाय, तो फेसबुकच्या माध्यमातून हरलीन कौर नावाच्या आयडीच्या संपर्कात होता, त्यांच्याशी तो मेसेंजरवर बोलत होता.
लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती पाठवली
शैलेश आयएसआय हँडलर प्रीतीशी व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून संपर्कात होता. शैलेशने प्रीतीला लष्करातील शिपाई म्हणून ओळखही दिली होती. सुरुवातीला शैलेश आणि प्रीती यांच्यात जिव्हाळ्याची चर्चा झाली. नंतर प्रितीने शैलेशला सांगितले की, ती ISI साठी काम करते आणि जर शैलेशने सहकार्य केले तर त्या बदल्यात ती त्याला चांगली रक्कम देईल. शैलेशने लष्कराशी संबंधित महत्त्वाच्या आस्थापनांचे ठिकाण आणि लष्कराच्या वाहनांच्या हालचालीचे फोटो प्रीती नावाच्या हँडलरला पाठवले.
एटीएस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु
शैलेशने प्रीतीला पाठवलेले फोटोही हरलीन कौर नावाच्या हँडलरला पाठवले होते. त्याबदल्यात शैलेशला एप्रिलमध्ये फोन पेवर दोन हजार रुपये मिळाले. यानंतर प्रीतीला लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती अनेक वेळा पाठवली, त्या बदल्यात त्याला प्रत्येक वेळी पैसे मिळाले. हरलीन कौर आणि प्रीती या आयएसआय हँडलर असल्याचे समोर आले आहे. सध्या उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी शैलेशची चौकशी करत आहेत.