'ती' जाहिरात ठरली पुरावा! हत्येच्या कटात अडकलेल्या अमृताला वडिलांनी १ वर्षापूर्वीच संपत्तीतून केले होते बेदखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:32 IST2025-10-28T15:29:22+5:302025-10-28T15:32:54+5:30
दिल्लीतील तिमारपूर येथे यूपीएससी विद्यार्थी रामकेश मीणा यांच्या हत्येनंतर या प्रकरणाचे मुरादाबाद कनेक्शन समोर आले आहे.

'ती' जाहिरात ठरली पुरावा! हत्येच्या कटात अडकलेल्या अमृताला वडिलांनी १ वर्षापूर्वीच संपत्तीतून केले होते बेदखल
UPSC aspirant murder case: दिल्लीतील तिमारपूर येथे यूपीएससीची तयारी करणाऱ्या रामकेश मीणा या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला असून, या हत्येचे थेट मुरादाबाद कनेक्शन समोर आले आहे. मुख्य आरोपी असलेली फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृता चौहान हिनेच, तिचे खासगी व्हिडीओ हटवण्यास नकार दिल्यामुळे रामकेशच्या हत्येचा क्रूर कट रचल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ६ ऑक्टोबर रोजी गांधी विहार येथील एका इमारतीत लागलेल्या आगीनंतर रामकेश मीणा यांचा जळालेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे अमृता चौहान, सुमित कश्यप आणि संदीप कुमार या तिघांना अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत अमृताने कबूल केले की, रामकेश मीणाकडे तिचे काही खासगी व्हिडिओ होते, जे तो डिलीट करत नव्हता. यामुळे संतापलेल्या अमृताने गुन्हेगारी मालिका पाहून हत्या करण्याची पद्धत शिकली आणि सुमित व संदीपच्या मदतीने रामकेशची हत्या केली. त्यानंतर या घटनेला अपघात भासविण्यासाठी आरोपींनी एलपीजी सिलेंडरच्या मदतीने इमारतीत स्फोट घडवून आणला होता.
वडिलांनी जाहिरात देऊन नाते तोडले
या प्रकरणातील मुख्य आरोपी अमृता चौहान हिच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमृताच्या चुकीच्या आचरणाला कंटाळून तिच्या वडिलांनी जवळपास एक वर्षापूर्वीच तिच्याशी असलेले संबंध तोडले होते. अमृताच्या वडिलांनी ८ जुलै २०२४ रोजी एका वृत्तपत्रात संबंध नसल्याची जाहिरात दिली होती. या जाहिरातीत त्यांनी स्पष्ट केले होते की, अमृताला तिच्या चल-अचल संपत्तीतून बेदखल करण्यात आले असून, तिच्या कोणत्याही कृत्याला कुटुंब जबाबदार असणार नाही.
वडिलांना असलेला हा 'संशय' आता हत्येच्या घटनेनंतर सत्यामध्ये बदलला. वडिलांनी दिलेली ही जाहिरात आता कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आली आहे.
रामकेशने १५ हून अधिक महिलांचे बनवले होते व्हिडीओ
रामकेश मीणासोबत अमृता मे महिन्यापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकेश मीणाने अमृतासह १५ हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले होते. आता पोलीस या महिला कोण होत्या आणि रामकेशच्या संपर्कात कशा आल्या, याचा तपास करत आहेत. दरम्यान, आरोपी संदीप कुमारच्या वडिलांनी, "जर माझा मुलगा दोषी असेल, तर मी त्याच्या बाजूने नाही; पण निर्दोष असल्यास शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यासोबत राहीन," अशी प्रतिक्रिया दिली आहे. या तिन्ही आरोपींवर दिल्ली पोलीस सखोल तपास करत आहेत.