युपीचा मुन्नाभाई MBBS... हजारो शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 17:54 IST2019-10-01T17:49:13+5:302019-10-01T17:54:05+5:30
उत्तर प्रदेशातीस सहारनपूर येथे हा प्रकार घडला

युपीचा मुन्नाभाई MBBS... हजारो शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक
मेरठ - बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या मुन्नाभाई एमबीबीएस या हिंदी सिनेमाप्रमाणे एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. मात्र, या मुन्नाभाईने फक्त आपण डॉक्टर असल्याचं भासवलं नाही तर गेल्या १० वर्षात हजारांहून जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. उत्तर प्रदेशातीस सहारनपूर येथे हा प्रकार घडला असून पोलिसांनी या बोगस डॉक्टरला म्हैसूर येथून अटक केली आहे. या बोगस डॉक्टराचं नाव ओम पाल (५०) उर्फ राजेश शर्मा असं आहे.
सहारनपूरचे एसपी विद्यासागर मिश्रा यांनी देवबंद येथील ओम पाल (५०) उर्फ राजेश शर्मा या व्यक्ती येथील स्थानिक आरोग्य केंद्रात बनावट पदवी आणि बनावट नोंदणीच्या आधारे स्वत: डॉक्टर असल्याचं सांगत गेल्या १० वर्षांपासून प्रॅक्टिस करत होता. तो एक नर्सिंग होमही चालवत होता. आरोपीने आतापर्यंत हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत अशी माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने म्हैसूर विद्यापीठात एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या नावे बनावट पदवी तयार करुन घेतली होती. खंडणीशी संबंधित एका फोन कॉलची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला असता बोगस डॉक्टरचा भांडाफोड झाला.
कोणालाही आपली संशय येऊ नये यासाठी त्याने होर्डिंगपासून ते प्रत्येक ठिकाणी डॉक्टर राजेश शर्मा या नावाचा उल्लेख केला. एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन ४० लाखांची खंडणी मागत खरी माहिती उघड करण्याची धमकी दिली असता आरोपी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला आणि तिथेच त्याच्या गैरप्रकाराचं पितळ उघड झालं. आरोपी आधी मंगळुरु हवाई दलाच्या रुग्णालयात पॅरामेडिक म्हणून काम करत होता. ज्याची पेन्शन अद्यापही त्याला मिळत आहे. त्यावेळी त्याच्यासोबत राजेश नावाचे एक डॉक्टरही काम करत होते. नंतर ते परदेशात निघून गेले. राजेश परदेशात निघून गेल्यानंतर ओम पाल याने राजेश यांच्या एमबीबीएस पदवीवर आपला फोटो लावला आणि फसवणूक करण्यास सुरुवात केली. पदवीच्या आधारेच त्याला आरोग्य केंद्रात सर्जनची नोकरी मिळाली अशी पुढे अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे.