प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:47 IST2025-10-01T09:46:08+5:302025-10-01T09:47:26+5:30
Crime news: सोनमचा एकदा राँग नंबर लागला होता, हा फोन मसीदालला केला होता आणि त्यातूनच त्यांच्यात बोलणे वाढून प्रेमसंबंध जुळले. लग्नाचे आमिष दाखवून दिल्लीत संसार थाटण्याचे स्वप्न दाखवले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सोनम ६ ऑगस्ट २०२३ रोजी आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून घरातून निघून गेली.

प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
हरदोई : प्रेमसंबंधातून घडलेल्या एका अत्यंत क्रूर आणि हृदयद्रावक घटनेने उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्हा हादरला आहे. एका विवाहित प्रेयसीची तिच्या प्रियकरानेच गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह अजगर असलेल्या जंगलातील एका विहिरीत फेकून दिला. तब्बल दोन वर्षांनंतर या गुन्ह्याचे बिंग फुटले असून, पोलिसांनी आरोपीच्या वडील आणि भावाला अटक केली आहे, तर मुख्य आरोपी प्रियकर अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिला भागातील सराय मारूफपूर गावातील सोनम नावाच्या विवाहित महिलेचे मधौगंज भागातील जेहद्दीपुर गावातील मसीदाल याच्याशी प्रेमसंबंध होते. सोनमचा एकदा राँग नंबर लागला होता, हा फोन मसीदालला केला होता आणि त्यातूनच त्यांच्यात बोलणे वाढून प्रेमसंबंध जुळले. मसीदालने सोनमला लग्नाचे आमिष दाखवून दिल्लीत संसार थाटण्याचे स्वप्न दाखवले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सोनम ६ ऑगस्ट २०२३ रोजी आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून घरातून निघून गेली.
स्वप्नभंग आणि हत्येचा कट
मसीदाल सोनमला घेऊन दिल्लीला गेला, मात्र तेथील परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. सोनमने घरी परत जाण्याचा तगादा लावल्यानंतर मसीदाल तिला घेऊन गावी परत आला. मात्र, येथेही त्यांच्यातील वाद मिटले नाहीत. अखेर सततच्या भांडणाला कंटाळून मसीदालने सोनमचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याने तिची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह जंगलातील एका विहिरीत फेकून दिला. धक्कादायक बाब म्हणजे, या विहिरीत अजगर असल्याचे त्याला माहीत होते.
असा लागला तपास
सोनमच्या सासरच्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, त्यांना सोनम आणि मसीदाल यांच्यातील मोबाईलवरील संभाषणाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मसीदालच्या कुटुंबीयांची चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले.
पोलिसांनी मसीदालचे वडील अयुब आणि भाऊ समीदाल यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सोनमचा मृतदेह कुठे फेकला, याची माहिती दिली. वनविभागाच्या मदतीने विहिरीतील अजगर बाहेर काढून पोलिसांनी शोध घेतला असता, त्यांना सोनमचा सांगाडा, केसांची क्लिप आणि तिचे कपडे सापडले.
पोलिसांनी आरोपी वडील आणि भावाला तुरुंगात पाठवले आहे, तर मुख्य आरोपी मसीदालचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रेमप्रकरणाचा असा क्रूर शेवट पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.