पुन्हा उन्नाव! होळीदिवशीच 9 वर्षीय मुलीवर बलात्कार; उपचारावेळी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 19:09 IST2020-03-12T19:07:55+5:302020-03-12T19:09:21+5:30
मंगळवारी संध्याकाळी घराबाहेर ४०० मीटर अंतरावर मुलगी बेशुद्ध पडलेली पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले.

पुन्हा उन्नाव! होळीदिवशीच 9 वर्षीय मुलीवर बलात्कार; उपचारावेळी मृत्यू
उन्नाव - उन्नावच्या बिहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत होळीच्या दिवशी नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर मुलीची गळा आवळण्यात आला होता. मुलगी बेशुद्ध अवस्थेत गावच्या वेशीवर आढळली, तेव्हा परिसरात खळबळ उडाली. मंगळवारी संध्याकाळी घराबाहेर ४०० मीटर अंतरावर मुलगी बेशुद्ध पडलेली पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले.
पोलिसांना माहिती मिळताच एसपी, एएसपीसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत मुलीला सीएचसी येथे दाखल करण्यात आले, तेथून तिला जिल्हा रुग्णालयात आणि नंतर कानपूर येथे हलविण्यात आले. मात्र, कानपुर हैलट रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मुलीचा अंत झाला. मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात लोकांवर बलात्कार आणि पॉक्सोसह इतर कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुपारी तीनच्या सुमारास काही जणांचं टोळकं माजी आमदाराच्या घराबाहेर पोहोचलं होतं. या टोळक्यात ९ वर्षांची मुलगी वडील आणि भावासोबत होती. वडिलांना पाणी पिण्यास सांगून ती मुलगी काही अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या हँडपंपावर गेली आणि त्यानंतर ती बेपत्ता झाली. सुमारे तासभर ती परतला नाही तेव्हा शोधाशोध सुरू झाली. घराबाहेर सुमारे ४०० मीटर अंतरावर इंदेमऊकडे जाणाऱ्या मार्गाच्या प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस मुलगी बेशुद्ध पडली होती. तिला पाहून ग्रामस्थांनी बलात्कार झाल्याची तिच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली. तिच्या अंगावर तशा खुणा दिसल्या. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक दाखल झाले आणि त्यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.
घाईघाईत मुलीला सीएचसी पाटन येथे दाखल केले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर कानपूर हैलट रुग्णालयात हलविण्यात आले. हैलट रुग्णालय येथे मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. रात्री उशिरा एसपी विक्रांतवीर, एसपी उत्तर व्ही.के. पांडे, सीओ अंजनी कुमार राय आणि बऱ्याच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान तीन तरुण संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. तपास करण्यासाठी चार वेगवेगळी पथके स्थापना करण्यात आल्याची माहिती एसपी विक्रांतवीर यांनी दिली. या गुन्हाच छडा लवकरच लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.