सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांना १० कोटींचा गंडा, अकोल्यातील महाठगाच्या दिल्लीत आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 09:11 IST2025-10-13T09:11:03+5:302025-10-13T09:11:38+5:30
राठोडने विविध शहरांतील पंचतारांकित हॉटेलात मुक्काम करत बनावट नियुक्तीपत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे देऊन उमेदवारांची दिशाभूल केली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन बनावट नियुक्तीपत्रे जप्त केली आहेत.

सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांना १० कोटींचा गंडा, अकोल्यातील महाठगाच्या दिल्लीत आवळल्या मुसक्या
सचिन राऊत -
अकोला : राज्यातील सुमारे ६०हून अधिक बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवत तब्बल १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अकोल्यातील नीलेश राठोड (३३) याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीहून अटक केली.
नीलेश राठोड हा स्वतःला केंद्र सरकारच्या विविध विभागांतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी परिचित असल्याचे भासवत असे. इंजिनीअर, डॉक्टर, शिक्षक तसेच कर विभागातील नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने बेरोजगार युवकांकडून पाच लाखांपासून पंधरा लाखांपर्यंत रक्कम उकळली. त्याने सुमारे १० कोटी रुपयांना गंडा घातल्या असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दोन मराठी चित्रपटांचा निर्माता
फसवणुकीतून मिळविलेल्या पैशांतून राठोडने दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटांशी निगडीत व्यक्तींचीही चौकशी होणार आहे. पोलिसांनी त्याच्या मालमत्तेचा तपशील गोळा करून जप्तीची प्रक्रिया सुरू केली
फुलविक्रेता ते ‘नोकरी एजंट’
पुण्यात २०१०-११ मध्ये फुले विकणारा राठोड २०१२ मध्ये सीआयएसएफमध्ये भरती झाला. २०२१ मध्ये एका फसवणूक प्रकरणात दोषी ठरल्याने त्याची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर तो पुन्हा रोज मजुरीवर काम करू लागला. याच काळात त्याने सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाखाली बेरोजगारांना गंडा घालण्यास सुरुवात केली.
बॉडीगार्डसह फिरणारा ‘महाठग’
राठोडने दिल्लीत १.५ कोटींचा ३ बीएचके फ्लॅट खरेदी केला असून तेथे कुटुंबासह राहात होता. बदलापूरमध्येही एक फ्लॅट आहे. ३० लाख रुपयांच्या आलिशान कारमधून गणवेशधारी चालकासह फिरत असे, सोबत सुरक्षेसाठी खासगी बॉडीगार्ड ठेवला होता.
हॉटेलमधून नियुक्तीपत्रे
राठोडने विविध शहरांतील पंचतारांकित हॉटेलात मुक्काम करत बनावट नियुक्तीपत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे देऊन उमेदवारांची दिशाभूल केली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन बनावट नियुक्तीपत्रे जप्त केली आहेत.
पुणे, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत गुन्हे दाखल
या फसवणूक प्रकरणी पुणे (डेक्कन), अकोला, वाशी, आझाद मैदान (मुंबई) आणि सहार पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तसेच नांदेड, बीड, धाराशिव, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतूनही तक्रारी दाखल आहेत.