दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:20 IST2025-12-28T11:20:37+5:302025-12-28T11:20:54+5:30
दोन पत्नींमधील वाद, बेरोजगारी आणि कौटुंबिक तणावामुळे हैराण झालेल्या एका तरुणाने चक्क स्वतःच्याच मृत्यूची खोटी कथा रचली.

दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
एखाद्या चित्रपटालाही शोभावी अशी थरारक आणि तितकीच विचित्र घटना उत्तराखंडमध्ये समोर आली आहे. दोन पत्नींमधील वाद, बेरोजगारी आणि कौटुंबिक तणावामुळे हैराण झालेल्या एका तरुणाने चक्क स्वतःच्याच मृत्यूची खोटी कथा रचली. १९ दिवस पोलीस त्याचा शोध घेत राहिले, मात्र अखेर तो दिल्लीत जिवंत सापडल्याने सर्वांचेच डोळे पांढरे झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
मूळचा दक्षिण दिल्लीतील समालखा येथील असलेला मनोज कुमार आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत अल्मोडा येथील रानीखेतमध्ये राहत होता. ८ डिसेंबर रोजी मनोज एका कामासाठी नैनितालला गेला, पण तो परतलाच नाही. त्याचा फोनही बंद लागल्याने घाबरलेल्या पत्नीने ९ डिसेंबर रोजी पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
दरीत सापडली स्कूटी, वाढली भीती!
तपासादरम्यान पोलिसांना बागेश्वर जिल्ह्यातील पन्याली परिसरात मनोजची स्कूटी एका खोल दरीत पडलेली आढळली. स्कूटीची अवस्था पाहून पोलिसांना वाटले की, हा अपघात असावा किंवा एखाद्या हिंस्त्र प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला असावा. पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली, पण मनोजचा मृतदेह किंवा कोणताही सुगावा लागत नव्हता.
१९ दिवसांनी दिल्लीत लागला छडा
पोलीस तांत्रिक तपासाच्या आधारे मनोजचा शोध घेत असतानाच शुक्रवारी त्याचे लोकेशन दिल्लीतील बिजवासन भागात दिसून आले. उत्तराखंड पोलिसांनी तातडीने हालचाली करत त्याला दिल्लीतून ताब्यात घेतले. मनोज तिथे नाव बदलून लपून राहत होता. त्याला सुखरूप शोधल्यानंतर आता पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहेत.
दोन लग्न आणि बेरोजगारीचे ओझे
पोलिसांनी केलेल्या चौकशीत मनोजने जे काही सांगितले ते ऐकून पोलीसही थक्क झाले. मनोजने आधी दुसऱ्या धर्माच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता, त्यापासून त्याला एक मुलगा आहे. त्यानंतर २०१९ मध्ये घरच्यांनी त्याचे दुसरे लग्न लावून दिले, या पत्नीपासूनही त्याला एक मुलगा आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही पत्नींना एकमेकींबद्दल काहीही माहिती नव्हती.
मनोज बेरोजगार होता आणि त्याला आपल्या दुसऱ्या पत्नीपासून सुटका हवी होती. या सर्व जंजाळातून बाहेर पडण्यासाठी त्याने आपली मृत्यूची खोटी कहाणी रचली. स्वतःची स्कूटी त्याने मुद्दाम दरीत फेकली जेणेकरून सर्वांना वाटेल की, त्याचा मृत्यू झाला आहे आणि तो दिल्लीत पळून गेला. सध्या पोलिसांनी त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले असून, अशा प्रकारे यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.