Digital Arrest: बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 14:16 IST2026-01-11T14:14:44+5:302026-01-11T14:16:02+5:30
UN Retired Doctor Fraud: दिल्लीत एका उच्चशिक्षित डॉक्टर दाम्पत्यासोबत घडलेली घटना ऐकून अंगावर काटा येईल. सायबर चोरांनी चक्क संयुक्त राष्ट्रातून निवृत्त झालेल्या डॉक्टरांना १५ दिवस 'डिजिटल अरेस्ट' करून त्यांच्याकडून १५ कोटी रुपये लुटले!

Digital Arrest: बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
देशाची राजधानी दिल्लीमध्ये सायबर गुन्हेगारीशी संबंधित अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. संयुक्त राष्ट्रातून निवृत्त झालेल्या एका डॉक्टर दाम्पत्याला सायबर गुन्हेगारांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढून तब्बल १४.८५ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. तब्बल १५ दिवस या दाम्पत्याला त्यांच्याच घरात ओलीस ठेवण्यात आले.
बनावट कोर्ट आणि अरेस्ट वॉरंटचा धाक
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. ओम तनेजा आणि डॉ. इंदिरा तनेजा हे दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश या पॉश भागात राहतात. सायबर गुन्हेगारांनी त्यांना पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारी असल्याचे भासवून फोन केला. त्यांच्या नावावर बेकायदेशीर कूरियर किंवा मनी लाँड्रिंगचे गुन्हे दाखल असल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.
१५ दिवस घरातच कैद
या गुन्हेगारांनी केवळ फोनवर धमकी दिली नाही, तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बनावट कोर्ट रूम, बनावट न्यायाधीश आणि खोटे अरेस्ट मेमो दाखवले. या सर्व प्रकारामुळे हे दाम्पत्य इतके घाबरले की, ते १५ दिवस कोणाशीही संपर्क न साधता आपल्याच घरातच कैद झाले. याच काळात सायबर गुन्हेगारांनी त्यांना चौकशीच्या नावाखाली घाबरवून त्यांच्या बँक खात्यातून १४.८५ कोटी रुपये गायब केले.
२०१६ मध्ये मायदेशी परतले होते डॉक्टर
तनेजा दाम्पत्य संयुक्त राष्ट्रात मोठ्या पदावर कार्यरत होते. २०१६ मध्ये ते दिल्लीत परतले. त्यांच्या निवृत्तीनंतरची आयुष्यभराची कमाई सायबर गुन्हेगारांनी एका झटक्यात लंपास केली. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस या मोठ्या रॅकेटचा तपास करत आहेत.
सायबर तज्ज्ञांचा इशारा
डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार कायद्यात अस्तित्वात नाही. पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा व्हिडिओ कॉलवर कोणालाही अटक करू शकत नाही. असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.