"फक्त माझ्यासाठी नाही वडिलांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; युएईमध्ये मुलीला संपवून महिलेने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:36 IST2025-07-15T20:14:53+5:302025-07-15T20:36:31+5:30
केरळच्या एका महिलेने मुलीसह सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.

"फक्त माझ्यासाठी नाही वडिलांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; युएईमध्ये मुलीला संपवून महिलेने उचललं टोकाचं पाऊल
संयुक्त अरब अमिरातीमध्ये ३३ वर्षीय केरळच्या महिलेच्या आणि तिच्या मुलीच्या मृत्यूने खळबळ उडाली. विवाहितीने तिच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केली. हुंड्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ सहन न झाल्याने पीडितेने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येपूर्वी लिहिले चिठ्ठीमध्ये पीडितेने सगळ लिहून ठेवलं होतं. महिलेच्या आईच्या तक्रारीनंतर केरळमधील कुंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पती कुत्र्यासारखी मारहाण करायचा, अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडायचा असं पीडितेने सुसाईड नोटमध्ये म्हटलं.
कोल्लमची रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय विपंचिका मणीने ८ जुलै रोजी शारजाहच्या अल नहदा भागातील तिच्या अपार्टमेंटमध्ये तिच्या दीड वर्षांची मुलगी वैभवीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. त्यानंतर आता विपंजिकाचा पती निधिशला पहिला आरोपी, त्याची बहीण नीथूला दुसरा आरोपी आणि वडिलांना तिसरा आरोपी बनवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नात दिलेला हुंडा पुरेसा नाही असे म्हणत आरोपींनी विपंजिकाचा मानसिक आणि शारीरिक छळ केला.
सासरच्या लोकांनी तिचे केस कापले जेणेकरून ती कुरूप दिसावी कारण ती गोरी होती. विपंजिकाला घटस्फोटाची नोटीसही पाठवण्यात आली होती. तिने पतीच्या विवाहबाह्य संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल तिला मारहाण करण्यात आली होती. विपंजिकाने लिहिलेल्या एका चिठ्ठीत पतीच्या घरी झालेल्या क्रूर छळाचा उल्लेख आहे. सासऱ्यांनी माझ्यावर अत्याचार केले आणि जेव्हा तिने तिच्या पतीला याबद्दल सांगितले. तेव्हा त्याने काहीही केले नाही आणि त्याने म्हटलं की वडिलांसाठी तुझ्याशी लग्न केलं आहे.
"मी त्यांचा छळ शांतपणे सहन करत होते. ते म्हणायचे की लग्न भव्य नव्हते, हुंडा कमी होता आणि त्यात गाडीही नव्हती. ते मला बेघर, कंगाल म्हणायचे आणि म्हणायचे की मी भीक मागून जगते. त्यांच्याकडे पुरेसे पैसे असूनही, ते माझ्या पगारासाठी मला त्रास देत होते. तो काही व्हिडिओ पाहायचा आणि मला ते बेडवर तसेच करण्याची मागणी करायचा. तसे केलं नाही तर तो निर्दयीपणे मारहाण करायचा," असं विपंजिकाने म्हटलं.