दोन तरुणांनी गळा दाबून रूम पार्टनरला संपवलं; हत्येचं कारण कळताच पोलीसही हादरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 12:02 IST2024-01-19T11:57:11+5:302024-01-19T12:02:17+5:30
तरुणाच्या मृत्यूनंतर इतर दोन रूम पार्टनर गायब असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेत दोघांनाही ताब्यात घेतलं.

दोन तरुणांनी गळा दाबून रूम पार्टनरला संपवलं; हत्येचं कारण कळताच पोलीसही हादरले!
नवी दिल्ली : दिल्लीतील निहाल विहार परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. पिण्याचं पाणी दिलं नाही म्हणून तरुणाने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने गळा दाबून रूम पार्टरनची हत्या केली. रचित असं मृत तरुणाचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील हरदोई येथील रहिवासी होता. खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी ही आत्महत्या दाखवण्यासाठी तरुणाच्या मृतदेहाला एका दोरीने पंख्याला लटकवलं. मात्र पोलिसांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ जानेवारी रोजी लक्ष्मी पार्क परिसरात एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तरुणाचा मृतदेह पंख्याला लटकलेला असल्याचं आढळून आलं. मात्र छताची उंची जास्त होती आणि आसपास खुर्ची वगैरे काहीच न आढळल्याने पोलिसांना शंका आली. त्यामुळे पोलिसांनी तरुणाचा मृतदेह खाली घेत याप्रकरणी तपास सुरू केला.
पोलिसांना तपासादरम्यान तरुणाच्या गळ्यावर खुना आढळून आल्या. त्यानंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत रचित आणि त्याचे दोन रूम पार्टनर एका ट्रान्सफार्मर बनवणाऱ्या कंपनीत कामाला होते, अशी माहिती रुमच्या मालकाने दिली. मात्र रचितच्या मृत्यूनंतर इतर दोन रूम पार्टनर गायब असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेत दोघांनाही ताब्यात घेतलं.
दरम्यान, घटनेच्या दिवशी आम्ही तिघेही नशेत होतो. तेव्हा आम्ही रचितला पिण्यासाठी पाणी मागितलं. मात्र त्याने ते देण्यास नकार दिल्याने आम्ही त्याची हत्या केली, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.